महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीचा (Mahabaleshwar Municipal Council Election) निकाल लागला आणि वाई तालुक्यातील बोरगांव आणि वयगांव या गावांमध्ये विजयोत्सव साजरा झाला. वयगांवच्या सुनबाई सौ. संगिता दत्तात्रय वाडकर आणि बोरगांवच्या सुनबाई सौ. पल्लवी संदीप कोंढाळकर यांनी नगरसेवकपदी विराजमान होत विजयी गुलाल उधळला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला. संगीता वाडकर आणि पल्लवी कोंढाळकर यांच्या विजयामुळे वयगांव आणि बोरगांव या दोन्ही गावांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
महाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक 2 (ब) मधून संगीता दत्तात्रय वाडकर यांना आणि प्रभाग क्रमांक 10 (अ) मधून पल्लवी संदीप कोंढाळकर यांना उमेदवारी दिली होती. दोन्ही उमेदवारांनी आपापल्या प्रभागात घवघवीत यश संपादित केले आहेत. प्रभाक क्रमांक 2 (ब) मध्ये दुरंगी लढत झाली. या लढतील संगीता दत्तात्रय वाडकर यांनी 606 मते मिळवत 413 मतांच्या मोठ्या फरकाने सोनाली बांदल यांचा पराभव केला. तर प्रभाग क्रमांक 10 (अ) मध्ये झालेल्या पंचरंगी लढतीत पल्लवी संदीप कोंढाळकर यांनी 402 मते मिळवत प्रतिस्पर्धी सुनीता आखाडे यांचा 186 मतांनी पराभव केला. संगीता वाडकर आणि पल्लवी कोंढाळकर यांच्या विजयाची बातमी कळताच वयगांव आणि बोरगांव या दोन्ही गावांमध्ये विजयाचा जल्लोष साजरा करण्याता आला. तसेत ग्रामस्थांनी दोन्ही सुनबाईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीत एकूण दहा प्रभागातील 20 जागांपैकी नगराध्यक्षपदासह 14 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे सुनील लक्ष्मण शिंदे हे नगराध्यक्षपदाच्या लढतीत विजयी झाले. या विजयामुळे महाबळेश्वर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढले आहे.

