कृषिप्रधान देशांमध्ये भारताचा समावेश केला जातो. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात एक वर्ग हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. विविध गोष्टींची भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. त्याचा शेतकऱ्यांना सुद्धा चांगला फायदा होतो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये निसर्ग वेळोवेळी शेतकऱ्यांना दगा देत असल्याच चित्र आहे. हवामानातील बदल, पूर, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, कीड व रोगराई या सर्व संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होतं आहे. उभं पीक आडवं झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. निसर्गाच चक्र बिघडून गेलं आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानापासून वाचवण्यासाठी भारत सरकारने Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पिकांना विमा संरक्षण दिले जात आहे.
PMFBY योजनेची सुरुवात कधी झाली?
प्रधानमंत्री पिक विमा योजना 13 जानेवारी 2016 रोजी सुरू झाली. ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे विमा संरक्षण देणे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीपासून त्यांना आर्थिक मदत करणे.
योजना कशी कार्य करते?
या योजनेंतर्गत, शेतकरी त्यांच्या पिकांसाठी अल्पदरात विमा भरतो आणि काही नुकसान झाल्यास त्याला विम्याची भरपाई मिळते. ही भरपाई थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.
प्रीमियमचे दर पुढील पद्धतीने आहेत
- खरीप हंगामासाठी: 2%
- रब्बी हंगामासाठी: 1.5%
- वार्षिक व्यावसायिक/बागायती पिके: 5%
बाकी रक्कम केंद्र आणि राज्य सरकार मिळून भरतात. म्हणजेच, शेतकऱ्यांना कमी प्रीमियम भरून मोठं संरक्षण मिळतं.
योजना कोणासाठी आहे?
- योजना सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे – मग ते अल्पभूधारक असोत, मोठे शेतकरी असोत किंवा कर्ज घेणारे असोत.
- कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना अनिवार्य आहे, तर इतरांसाठी ऐच्छिक आहे.
कशा प्रकारची नुकसान भरपाई मिळते?
- नैसर्गिक आपत्ती – पाऊस न पडणे, अतिवृष्टी, पूर, गारपीट इ.
- कीड व रोगराई – शेतातील पिकांना अचानक लागलेली कीड किंवा रोग.
- काढणीपूर्व व नंतरची हानी – वादळ, गारपीट इत्यादीमुळे शेतात पडलेली हानी.
- स्थानिक आपत्ती – जसे की वादळ, आग लागणे यामुळे झालेलं नुकसान.
शेतकऱ्यांना काय फायदे होतात?
- आर्थिक स्थैर्य – पिकाचं नुकसान झालं तरी विमा भरपाईमुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान भरून निघतं.
- शेतीसाठी आत्मविश्वास – शेतकरी जोखमीशिवाय नवे प्रयोग करू शकतो.
- कर्जफेडीचा भार कमी – पिके फसल्यानंतरही विम्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज फेडता येते.
- सरकारकडून पारदर्शक व्यवहार – विम्याची रक्कम थेट खात्यात जमा होते.
अर्ज कसा करावा?
शेतकरी ऑनलाईन पोर्टल (https://pmfby.gov.in/) किंवा आपल्या गावातील सेवा केंद्रात जाऊन अर्ज करू शकतो. त्यासाठी आधार कार्ड, सातबारा उतारा, पिकाची माहिती, बँक पासबुक आवश्यक असते.
प्रधानमंत्री पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक सुरक्षिततेची कवच आहे. नैसर्गिक संकटातही ही योजना त्यांच्या पाठिशी उभी राहते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे.