पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेला राजगड (Rajgad Fort News ) किल्ला विविध रानफुलांनी बहरून गेला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर राजगडाचे अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे दुर्ग प्रेमींची पाऊले आपसूक गडाच्या दिशेने वळत आहेत. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातूनही पर्यटक गडाला भेट देण्यासाठी येत आहेत. परंतू गडाची अपूरी माहिती आणि ट्रेकींग करण्याचा अपूरा अनुभव किंवा अन्य काही कारणांमुळे गडाच्या परिसरात काही अपघात गेल्या काही वर्षांमध्ये घडले आहेत. असाच अपघात काल (09 ऑक्टोबर 2025) झाला आणि संजीवनी माची बुरुजावरून 40 फुट खोल दरीत एक 24 वर्षीय तरुणी पडली. सुदैवाने ती सुखरूप असून पुण्यातील हवेली आपत्ती व्यवस्थापन समूहाच्या सदस्यांनी तिला गडाखाली आणलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
अधिक माहिती अशी की, अंजली पाटील (24) ही तरुणी राजगड किल्ला पाहण्यासाठी काल गेली होती. मात्र, संजीवनी माचीवर गेली असता बुरुजावरून 40 फूट खोल दरीमध्ये पडली. खोल दरीत पडल्यामुळे तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला कोणत्याही प्रकारची हालचाल करता येत नव्हती. याची माहिती हवेली आपत्ती व्यवस्थापन समूहाच्या सदस्यांनी मिळाली असता त्यांनी तात्काळ राजगडाच्या दिशेने धाव घेतली. साधारण मध्यरात्री 2 च्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन समूहाचे सर्व सदस्य गडावर पोहोचले. त्यानंतर सर्वांनी मिळून तरुणीला सुखरूप गडाखाली आणले. पहाटे सहाच्या दरम्यान तिला रेस्क्यू करून वेल्हे आरोग्य केंद्राचे डॉक्टर पाटील यांच्याकडे प्राथमिक तपासणीसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला पुढील उपचारांसाठी पुणे शहरामध्ये पाठवण्यात आले आहे. याप्रसंगी हवेली आपत्ती व्यवस्थापन समूहाचे अध्यक्ष तानाजी भोसले यांच्यासह सदस्यांनी मोलाची कामगिरी बजावली.