Safety Awareness – शेगडी पेटवली आणि कंटेनरमध्ये झोपले, महाबळेश्वरमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू; पण कसा? नेमकं काय झालं?

मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar News) थंडीचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपडे आणि शेकोटीच्या (Safety Awareness) मदतीने शरीराला उब देण्याचा प्रयत्न केला जातो. असाच प्रयत्न दोन बांधकाम मजुरांनी केला आणि दोघेही कोळशाची शेकडी पेटवून कंटेनरमध्ये झोपले. पण ते पुन्हा उठलेच नाही, दोघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सदर घटना महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अहिर मुऱ्हा येथे घडली आहे. मृतांमध्ये मतिऊर रहमान (53, बिहार) आणि विपिन तिवारी (55, बिहार) यांचा समावेश आहे. सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, थंडीपासून वाचण्यासाठी मतिरून रहमान आणि विपिन तिवारी यांनी रात्री कोळशाची शेगडी पेटवली आणि कंटेनरमध्ये ठेवली. कंटेनरमध्ये बंद करून दोघेही झोपले. मात्र, सकाळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढलून आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नेमका मृत्यू कशामुळे झाला? 

कोळशाच्या ज्वलनामुळे कार्बन मोनॉक्साईडसारखा (Coal Carbon Monoxide Poisoning) विषारी वायू निर्माण होतो. हा वायू रंगहीन व वासहीन असल्यामुळे तो सहज लक्षात येत नाही. बंद कंटेनरसारख्या जागेत कोळसा जळत राहिल्यास कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वेगाने वाढते आणि उपलब्ध ऑक्सिजन कमी होतो. परिणामी व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो, चक्कर येते, बेशुद्धावस्था निर्माण होते आणि वेळेवर मदत न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो.अशाच प्रकारे या दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

तुम्ही यातून काय धडा घ्यालं?

  • बंद जागेत (कंटेनर, खोली, शेड, ट्रक, गोदाम) कोळसा, शेगडी, जनरेटर किंवा इतर इंधन कधीही जाळू नये.
  • अशा ठिकाणी काम करताना पुरेशी हवा खेळती राहील याची खात्री करावी. दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
  • रंगहीन आणि वासहीन वायू असल्यामुळे धोका लगेच जाणवत नाही, त्यामुळे बंद जागेत अचानक चक्कर येणे, डोके दुखणे, मळमळ जाणवली तर त्वरित बाहेर यावे.
  • कामाच्या ठिकाणी किंवा घरात शक्य असल्यास कार्बन मोनॉक्साईड अलार्म/डिटेक्टर बसवावा.
  • ट्रक, कंटेनर किंवा बंद जागेत झोपणे टाळावे, विशेषतः आत इंधन किंवा जळणाचा स्रोत असल्यास.
  • अशा घटनांमध्ये तात्काळ आपत्कालीन सेवांशी संपर्क साधावा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत करण्याचा प्रयत्न करू नये.
  • लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना अशा ठिकाणांपासून दूर ठेवावे, कारण त्यांना धोका अधिक असतो.
error: Content is protected !!