सातारा (Satara Crime) तालुक्यातील सासपडे गावात 13 वर्षी चिमुकलीची निर्घृण हत्या करण्यात आली. या संतापजनक घटनेमुळे साताऱ्यासह महाराष्ट्र हादरून गेला आहे. सासपडे गाव आक्रमक झाले असून नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सोमवारी (13 ऑक्टोबर 2025) सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. मोठ्या संख्येने सासपडे ग्रामस्थ आणि सातारकर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या घटनेचा निषेध म्हणून यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. राहुल यादवला ठेचून ठेचून मारा, फाशी देण्यापेक्षा भर चौकात त्याला जिवंत जाळा, अशी संतप्त भावना मृत आर्याच्या आईने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
संशयित राहुल यादव पोक्सोच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटला
संशयित राहुल यादववर 2012 साली पोक्सोचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात त्याला अटक सुद्धा करण्यात आली होती. मात्र, पुढे त्याची निर्दोष सुटका करण्यात आली होती. त्यामुळे तपास योग्य का झाला नाही? अशी विचारणा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. तसेच संतप्त ग्रामस्थांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्व पोलीस अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बोरगाव पोलीस ठाण्याच्या तत्कालीन अधिकार्यांची SIT चौकशी, राहुल यादववर दाखल असलेल्या पहिल्या गुन्ह्याचा तपास CID मार्फत करण्यात यावा, अशा मागण्या आक्रोश मोर्चामध्ये करण्यात आल्या आहेत. दरम्यान, संशयित राहुल यादव याला सातारा जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने 18 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नराधमाला पॉर्न बघण्याचं व्यसन
घटना घडल्यानंतर पोलिसांनी सहा तासात आरोपी राहुल यादवला बेड्या ठोकल्या. तसेच कबुली जबाब देताना शाळकरी मुलीच खून केल्याचं त्याने मान्य केलं आहे. राहुल यादवचा मोबाईल पोलिसांनी तपासला असता त्यामध्ये अनेक अश्लील व्हिडीओ आढळून आले आहेत. नराधमाला अश्लील व्हिडीओ बघण्याचं व्यसन होतं, हे पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे.
त्याला पण ठेचून ठेचून मारा
माझ्या पोरिला किती वेदना झाल्या असतील. त्याच्यामुळे त्याला पण ठेचून ठेचून मारायचा, फाशी देण्यापेक्षा त्याला भर चौकात काडी लावून जाळायचा. माझ्या पोरगीची ताकत माझ्यात आलीये मी काडी लावते त्याला. पोरगी शरीराने गेली असली तरी, तिच मन माझ्यापाशी आहे, अशी भावना मृत आर्याच्या आईने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.