वाई (Wai News) तालुक्यातील वयगांव गावामध्ये “माझी वसुंधरा अभियान 6.0” अंतर्गत विविध सामाजिक आणि पर्यावरणपुरक उपक्रम राबवविले जात आहेत. गावाच्या विकासात ग्रामस्थांचा मोठा वाटा असतो, त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणं हे ग्रामपंचायतीचे सामाजिक कर्तव्य असते. याच अनुषंगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शनिवारी (11 ऑक्टोबर 2025) महा आरोग्य शिबिराचे आयोजन वयगांवमध्ये करण्यात आले होते.
(फोटो सौजन्य – तेजस वाडकर)
वयगांवमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये सकाळी 10 वाजता शिबिराला सुरुवात झाली. वाईमधील इंडियन रेड क्रॉस सोसायटी बेल एअर ब्लड सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात केली.
धनुर्वात प्रतिबंधक लस, हिमोग्लोबिनची तपासणी, शालेय विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक आरोग्य तपासणी आणि रक्तगट तपासणी सुद्धा करण्यात आली.
त्याचबरोबर सरपंचांसह तरुणांनी रक्तदान करून आपलं सामाजिक कर्तव्य पार पाडलं.
या महा आरोग्य शिबिराला गटविकास अधिकारी पंचायत समिती वाई विजयकुमार परीट आणि त्यांच्या पत्नी रुपाली विजय परीट यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सरपंच अश्विनी सुतार, उपसरपंच प्रशांत वाडकर आणि ग्रामपंचयात अधिकारी श्रीदेवी नुले यांच्या पुढाकाराने आणि सर्व तरुण, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत महा आरोग्य शिबीर यशस्वी झाले.



