अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ माँ साहेब (Rajmata Jijau) यांचे जन्मस्थळ म्हणजे सिंदखेड (Sindkhed Raja Maharashtra) होय. राजमाता जिजाऊ यांच्या नावामुळे सिंदखेडराजासह बुलढाणा जिल्ह्याचे नाव जगाच्या कनाकोपऱ्यात पोहोचले आहे. महाराष्ट्रात जन्मलेल्या क्वचीतच एखाद्या व्यक्तीला राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळा बद्दल माहिती नसेल. प्रत्येकानेच टीव्हीवर, शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात किंवा सोशल मीडियावर राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाबद्दल वाचलं किंवा ऐकलं असेल. परंतु प्रत्येकालाच सिंदखेडराजाला जाणं शक्य झालं असेल असं नाही. त्यामुळेच हा विशेष ब्लॉग, या ब्लॉगच्या माध्यमातून जिजाऊंच्या जन्मस्थळाची आपण सफर करणार आहोत.
Sindkhed Raja Maharashtra हे बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव. जे राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्यामुळे जगभरात प्रचलित आहे. या ठिकाणी असलेल्या लखुजी जाधव यांच्या गढीत जिजाऊंचा जन्म झाला. त्यामुळे या गढीला आता मातुलतिर्थ ना नावाने ओळखले जाते. सध्या लखुजी जाधव यांची ही गढी पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून पुरातत्व खात्याने उत्तमप्रकारे गढीची डागडूजी केली आहे. त्यामुळे गढीमध्ये पाहण्या सारख्या अनेक गोष्टी आहेत.
Sindkhed Raja Maharashtra आणि इतिहास
राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ हाच सिंदखेडराजाचा सर्वात मोठा इतिहास आहे, असं म्हटल तर चुकीचे ठरणार नाही. सिंदखेडराजा आणि लखुजी जाधव यांचा रंजक इतिहास आहे. इतिहासात करण्यात आलेल्या उल्लेखानुसार, सिंदखेड येथे सुरुवातीला गवळी राजाची राजवट होती. प्राणीमात्रांवर असणाऱ्या प्रेमापोटी त्याने गावात गाई गुरांसाठी काही तलाव बांधले होते. परंतु कालांतराने सोळाव्या शतकात सिंदखेडची देशमुखी मुळे घराण्याच्या ताब्यात होते.
मुळे घराण्याच्या ताब्यात सिंदखेडची देशमुखी गेल्यानंतर कपटी स्वभावाच्या गावातील रविराव ढोणे यांनी हीच संधी साधली. मुळे घराण्याचा विश्वासघात करत देशमुखी सत्ता काबीज करण्याच्या उद्देशाने त्याने संपूर्ण मुळे घराण्याची कत्तल केली आणि देशमुखी मिळवली. या नरसंहारात मुळे घराण्यातील यमुनाबाई ही गर्भवती महिला सुदैवाने वाचली होती. तिने तत्काळ गाव सोडलं आणि दौलताबाद घाटले आणि लखुजी जाधवांचा आश्रय घेतला.
त्या काळात लखुजी जाधव हे निजामशहाचे पंचहजारी मनसबदार होते. सिंदखेड परगण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. यमुनाबाईने लखुजी जाधवांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर लखुजी जाधवांनी क्षणाचाही विलंब न करता फौजेनिशी कपटी रविरावचा काटा काढला. मुळे घराण्याची कत्तल केल्यामुळे सिंदखेडची देशमुखी सांभाळणारे कोणीही हयात नव्हते. त्यामुळे इ.स 1576 साली सिंदखेडची देशमुखी लखुजी जाधव यांना मिळाली. खऱ्या अर्थाने लखुजी जाधव यांना देशमुखी मिळाल्यानंतर सिंदखेडला चांगले दिवस यायला सुरुवात झाली. विकासाच्या दृष्टीने त्यांनी अनेक कामे करून घेतली. गढी बांधली, बाजारपेठा वसवल्या, पाण्याची व्यवस्था लावली लोकांच्या अडीअडचणी हेरुन कामाची बांधणी केली, अनेक मंदिरे उभारली. सिंदखेडमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या निळकंठेश्वर रामेश्वर मंदिराची त्यांनी दुरुस्ती केली. अशी अनेक कामे त्यांनी सिंदखेडमध्ये केली.
पौष शुद्ध पौर्णिमा शके 1519 म्हणजेच 12 जानेवारी 1598 रोजी लखुजी जाधवांच्या गढीतील राजवाड्यामध्ये म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. जिजाऊंचे बालपण गढीमध्येच गेले. वडील लखुजी जाधव आणि आई म्हाळसाबाई यांच्या छत्रछायेखाली जिजाऊ मोठ्या झाल्या. इसवी सन 1610 साली शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा सिंदखेडराजा येथे विवाह झाला. लखुजी जाधवांचा निजामाच्या मारेकऱ्यांनी घात केला होता. 25 जुलै 1629 रोजी निजामाने लखुजी जाधव यांना सहकुटुंब दौलताबादला बोलावले होते. दबा धरून बसलेल्या निजामाच्या मारेकऱ्यांनी लखुजी जाधव त्यांचे दोन पुत्र आणि नातू यांना ठार मारले.
पाहण्यासारखे काय आहे
लखुजी जाधवांची गढी सिंदखेडराजा गावातील भर वस्तीमध्ये आहे. गढीमध्येच प्रवेश करताच जिजाऊंचा पुर्णाकृती पुतळा आपलं लक्ष वेधून घेतो. शासनाच्या माध्यामातून या ठिकाठी चांगला बगिचा बनवलेला आहे. गढीचे प्रवेश्द्वार भव्य असून प्रवेशद्वारावर नगारखाना आपल्याला पहायला मिळतो. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर पहारेकऱ्यांच्या देवढ्या नजरेस पडतील. या देवड्यांमद्ये पुरातत्व खात्याने वीरगळ, जाती आणि अनेक मुर्त्या ठेवलेल्या आहेत.
गढीत प्रवेश केल्यानंतर राजवाड्याची भिंत दिसते. ऐतिहासिक पुस्तकांमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखानुसार राजवाडा हा दोन मंजली होता. गढीमध्ये एक विहिर असून गढीमध्ये पाण्याचा तो एकमेवस स्त्रोत आहे. विहिरीपासून थोड पुढे चालत गेल्यानंतर वरच्या बाजूला एक खोली आहे. या खोलीचे वैशिष्ट्य म्हणजे या खोलीत जिजाऊंचा जन्म झाला होता. या खोलीमध्ये जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त वाड्याच्या मधल्या भागात शासनाच्या माध्यमातून सुंदर बगीचा तयार करण्यात आलेला आहे. गढीची फेरी साधारण अर्धा ते एक तासाच पूर्ण होते.
लखुजी जाधवांच्या गढी व्यतिरिक्त गढीच्या आजबाजूच्या परिसरात अनेक ऐतिहासिक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. जसे की, काळा कोट, निळकंठेश्वराचे मंदिर, मंदिराला लागून असलेली बारव, रामेश्वराचे मंदिर आपल्या पहायला मिळते. रामेश्वराचे दर्शन झाल्यानंतर त्याच रस्त्याने पुढे गेल्यानंतर लखुज जाधव, त्यांचे पुत्र आणि नातू यांच्या भव्य समाधी लक्ष वेधून घेतात. त्याच बरोबर गावात पुतळा बारव नावाची अष्टकोनी बारव आहे. सुरसुंदरीची मुर्ती या बारवेच्या भिंतीवर आहे. त्यामुळे या बारवेला पुतळा बारव असे नाव पडले आहे. त्याच बरोबर गढीपासून एक किलोमीटरच्या अंतरावर चांदनी आणि मोती तलाव सुद्धा पाहण्यासारखे आहेत.
सिंदखेडला पोहचायचे कसे
सिंदखेड हे सर्व शहरांनी जोडलेले प्रगतशील गाव आहे. त्यामुळे गावात एसटी बसची सुविधा आहे. तुम्ही जर रेल्वेने सिंदखेडला येण्याच्या विचारात असाल, तर तुम्हाला जालना रेल्वे स्टेशनला उतरावे लागणार आहे. जालना रेल्वे स्टेशन ते सिंदखेडराजा हे एक तासाचे अंतर आहे.
सिंदखेड येथे जेवणाची सोय आहे का
सिंदखेड हे गजबजलेले गाव आहे. त्यामुळे गावात राहण्याची, जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची मुबलक प्रमाणात सोय आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.