Ukadiche Modak – बाप्पा पावला! BMC चा विशेष उपक्रम, एका क्लिकवर मोदक घरपोच मिळणार, जाणून घ्या कसं

अवघ्या काही दिवसांनी लाडक्या बाप्पाच ढोल-ताशांच्या गजरात आगमन होणार आहे. त्यामुळे सर्व गणेशभक्तांना आता गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गणरायाच आगमन म्हणजे खवय्यांसाठी एक पर्वणीच. गणेशाच आवडत खाद्य म्हणजे मोदक (Ukadiche Modak). हे मोदक जसे गणरायाला आवडतात तसे ते त्यांच्या भक्तांना सुद्धा आवडतात. त्यामुळे जवळपास सर्वांच्याच घरी मोदकाचा प्रसाद आवर्जून केला जातो. परंतु कामाचा व्याप, धावपळ या सर्व गोष्टींमुळे बऱ्याच जणांना मोदक बनवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. तुम्हालाही मोदक बनवायला वेळ मिळत नाही का? या प्रश्नाच उत्तर होकारार्थी असेल, तर काळजी करू नका. कारण तुम्हाला आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून एका क्लिकवर मोदक घरपोच मिळणार आहेत. 

मुंबई महानगरपालिकेशी (BMC) संलग्न असलेल्या महिला बचत गटांनी यंदाच्या गणेशोत्सवासाठी एक विशेष आणि अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईकरांना अस्सल चवीच्या मोदकांचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘मोदक महोत्सव 2025’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे पारंपारिक उकडीचे तसेच तळलेले मोदक मुंबईकरांना घरपोच उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

गणेशोत्सवात मोदकांची मागणी प्रचंड असते, याचा फायदा घेत बचतगटातील महिलांना लाभ करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक चांगला उपक्रम सुरू केला. मुंबईकरांना मोदक मागवण्यासाठी 21 ते 25 ऑगस्ट 2025 या कालावधीत ऑर्डर नोंदवता येणार आहे.

मोदक ऑनलाईन ऑर्डर कसे करायचे? 

ऑर्डर नोंदणीसाठी https://shgeshop.com या वेबसाइटवर जा

यानंतर तुम्हाला हवे ते, हवे तितके मोदक ऑर्डर करा

मोदकांच्या होम डिलिव्हरीसाठी कोणत्याही प्रकारचे डिलिव्हरी शुल्क आकारले जाणार नाही.

मोदकांची होम डिलिव्हरी 27 ऑगस्ट 2025 रोजी केली जाणार आहे.

त्यामुळे आता मोदक बनवण्याच टेन्शन नाही. एका क्लिकवर तुम्हाला घरपोच मोदक मिळतीत अशी व्यवस्था मुंबई महानगरपालिकेने केली आहे.