Vithal Kamat – हॉटेलमध्ये स्वत: कूक ते यशस्वी उद्योजक, मराठी माणसाचा अटकेपार झेंडा

मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, असं म्हणणाऱ्या तिंपाट लोकांच्या तोंडावर कायमची पट्टी लावण्याच काम महाराष्ट्रातील अनेक व्यावसायिकांनी केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशी रत्न महाराष्ट्राच्या मातीत घडली आणि घडत आहेत. देशात परदेशात आपल्या नावाचा डंका त्यांनी वाजवला. पुरुषांच्या जोडीला महिलांनी सुद्धा आघाडी घेतली. वर्तमानाचा विचार केला तर, जगभरातील अनेक देशांमध्ये मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात आज पुढे आहे. मात्र, या सर्व व्यक्तींमध्ये एका व्यक्तीची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. शेकडो हॉटेल्सची उभारणी करून खवय्यांच्या जीभेवर त्यांच्या पदार्थांची चव अगदी सहज रेंगाळते असे मराठी उद्योजक म्हणजे vithal kamat.

मुंबई-पुणे किंवा मुंबई-गोवा या मार्गांवरून जात असताना विठ्ठल कामत या नावाची अनेक हॉटेल्स तुमच्या नजरेस पडत असतील. आम्ही स्वत:सुद्धा गावी जात असताना थांबून विठ्ठल कामत हॉटेलमध्ये पदार्थांची चव चाखली आहे. तुम्ही सुद्धा प्रवास करत असताना विठ्ठल कामत या नावाने अनेक हॉटेल्स पाहीले असतील. मात्र, विठ्ठल कामत हे नाव फक्त महामार्गांवर असणाऱ्या हॉटेल्स पुरते मर्यादीत नाही. या नावाची व्याप्ती यापलीकडे खूप मोठी आहे. त्यांचा हा व्यावसायिक जीवन प्रवास सर्वांना प्रेरणा देणारा आहे.

प्रारंभिक जीवन | Vitthal Kamat Life Journey

विठ्ठल कामत यांचा जन्म 1956 साली झाला. त्यांचे संपूर्ण बालपण आनंदात गेले. कारण त्यांचे वडील व्यंकटेश कामत यांनी हॉटेल व्यवसायाची पाळेमुळे रोवायला विठ्ठल यांच्या जन्मा आधीपासूनच सुरुवात केली होती. व्यंकटेश यांनी आपल्या कारकि‍र्दीत अशक्यप्राय कष्ट केले. वेळप्रसंगी हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे सुद्धा काम केले. मात्र, त्यांचे ध्येय वेगळे होते. हॉटेल व्यवसायिक होण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, रात्रीचा दिवस केला, कष्ट करायची लाज बाळगली नाही. अखेर 1952 साली त्यांचे स्वप्न सत्यात उतरले आणि सत्कार नावाचे पहिले हॉटेल त्यांनी सुरू केले.

हॉटेल उभे करण्यात त्यांच्या पत्नी आणि विठ्ठल कामत यांच्या आईंनी त्यांना मोलाची साथ दिली. सत्कार हॉटेल उभे करण्यासाठी त्यांनी त्यांचे दागिने घाण ठेवले आणि आपल्या पतीच्या स्वप्नांना बळ दिले. हॉटेल व्यवसाय सुरुळीत सुरू होता. सर्व काही आनंदात चालले होते. विठ्ठल कामत सुद्धा हळूहळू मोठे होत होते. तल्लख बुद्धीचे विठ्ठल कामत अभ्यासात तरबेज होते. 1973 साली त्यांनी मुंबईच्या रॉबर्ट मनी हायस्कुलमधून आपले शिक्षण पूर्ण केले.

पतीचे कष्ट विठ्ठल यांच्या आईने जवळून पाहिले होते. त्याचे वटवृक्ष करण्याची जबाबदारी विठ्ठल यांनी घ्यावी, अशी त्यांची फार इच्छा होती. मात्र, विठ्ठल कामत यांना हॉटेल व्यवसायामध्ये रस नव्हता. त्यांना इंजीनियर व्हायचं होतं. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि आपली इंजीनियरिंगची पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली. एकीकडे विठ्ठल यांचे शिक्षण पूर्ण झाले. दुसरीकडे व्यंकटेश यांनी आपला व्यवसाय चांगला वाढवला. व्यंकटेश यांनी दोन हॉटेल उभी केली होती. मात्र, त्यांच्या या व्यवसायाला कुटुंबातीलच एका व्यक्तीची नजर लागली. जवळच्याच व्यक्तीने पाठीत खंजीर खुपसून व्यंकटेश यांची फसवणूक केली आणि हॉटेल हिसकावले. यामुळे व्यंकटेश यांना मोठा आर्थिक फटका बसला.

वडि‍लांना आधार देण्यासाठी हॉटेल व्यवसायात पहिले पाऊल

वडिलांची फसवणूक केल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. त्यांच दुसरं हॉटेल त्यांच्या ताब्यातून गेलं होत. सत्कार हॉटेलचा ताबा अद्याप व्यंकटेश कामत यांच्याकडेच होता. सत्कार हॉटेलही असंच लुबाडले जाईल याची भीती विठ्ठल कामत यांना होती. त्यामुळे त्यांनी वडिलांसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यास सुरुवात केली. हॉटेल व्यवसायात त्यांनी आता पूर्ण लक्ष घालण्याचा निर्णय पक्का केला होता. विठ्ठल कामत यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईला सर्वाधिक आनंद झाला. कारण त्यांना पहिल्या पासूनच वाटत होते की, विठ्ठल यांनी हॉटेल व्यवसायाच लक्ष घालावे. आई-वडील आनंदी झाले होते. त्यानंतर त्यांनी फक्त व्यवसाय वाढवण्यासाठी काम केले आणि मुंबईसह महाराष्ट्रात ‘Vithal Kamat’ या नावाच्या अनेक हॉटेल्सची साखळी तयार केली.

Noel Tata – रतन टाटा यांचे उत्तराधिकारी, किती आहे नोएल टाटा यांची संपत्ती? वाचा सविस्तर…

हॉटेल व्यवसायाचे धडे गिरवण्यासाठी लंडन गाठले

विठ्ठल कामत यांनी व्यवसाय वाढीसाठी हालचाल करण्यास सुरुवात केली. त्या संदर्भात वडिलांशी चर्चा केली आणि व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांचा मनात असणारा विचार त्यांनी बोलून दाखवला. त्यानंतर हॉटेल व्यवसायातले बारकावे शिकून घेण्यासाठी त्यांनी लंडन गाठले. लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये कूक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. यावेळी त्यांना प्रती आठवडा 75 पौंड इतकी रक्कम पगार स्वरुपात मिळत होती. लंडन, अमेरिकासह अनेक देशांचा त्यांना या काळात दौरा केला आणि हॉटेल व्यवसायासाठी लागणारी कौशल्य आणि त्यातले बारकावे शिकून घेतले.

अन् भारतातील पहिले इको-टेल फाइव्ह स्टार हॉटेल मुंबईत उभे झाले

लंडनसह अनेक देशांमध्ये त्यांनी घेतलेल्या अनुभवाला कृतीची जोड देण्याची वेळ आली होती. त्यासाठी त्यांनी आता वेगाने हालचाल करण्यास सुरुवात केली. सांताक्रूझ विमानतळाजवळ असणारे 4 Star Hotel प्लाझ्मा विकला जाणार असल्याची खबर त्यांना मिळाली. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सदर प्लाझ्मा विकत घ्यायचा होता. परंतु त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी माघार न घेता रिस्क घेत बँकेतून कर्ज घेतले आणि प्लाझ्मा विकत घेतला.

प्लाझ्मा विकत घेतल्यानंतर त्यांनी त्याची रचना त्यांच्या पद्धतीने करण्यास सुरुवात केली. अफाट मेहनत घेतली आणि ज्या ठिकाणी प्लाझ्मा उभा होता, त्याच ठिकाणी 1997 साली त्यांनी महाराष्ट्र्तील नव्हे तर भारतातील पहिले इको-टेल फाइव्ह स्टार हॉटेल उभे केले. पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या विठ्ठल कामत यांनी या हॉटेलची रचना सुद्धा त्याच पद्धतीने केली होती. Reduce, Reuse आणि Recycle या तत्वावर Hotel Orchid नावारुपाला आलं. हे भारतातील पहिलं पर्यावरण पूरक हॉटेल आहे. हॉटेलचा लौकिक दिवसेंदिवस वाढतच गेला आणि हॉटेल ऑर्किड जगातील सर्वाधिक 375 हून अधिक पुरस्कार मिळवणारं हॉटेल ठरलं.

कर्जाचा डोंगर वाढला आणि हॉटेल बंद करण्याची वेळ आली

ऑर्किड हॉटेल उभं करण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची कमतरता होती. त्यामुळे त्यांनी त्या काळात भरमसाट कर्ज घेतले होते. कर्जाचा डोंगर प्रचंड वाढला होता. 282 कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर घिरट्या घालतं होता. त्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आली होती. पैसे कुठून आणायाचे, हॉटेल आता बंद पडणार अशा अनेक विचारांनी त्यांना ग्रासलं होतं. आत्महत्येचा विचार त्यांच्या मनात आला होता. मात्र त्यांच्या इमारतीच्या 23 व्या मजल्यावर काम करणाऱ्या पेंटरच्या एका कृतीमुळे त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला. तो पेंटर 24 व्या मजल्यावर काहीही सुरक्षाकवच नसताना अगदी बिंदास भिंत रंगवण्याचे काम करत होता. जीवघेणी जोखीम पत्करून त्याने परिस्थितीला सामोरे जाण्याचे कसब आत्मसात केले होते. त्याच्याकडे पाहून विठ्ठल कामत यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आणि त्यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली.

पर्यावरणप्रेमी विठ्ठल कामत

एक यशस्वी हॉटेल व्यवसायिक म्हणून विठ्ठल कामत यांची ओळख आहे. परंतु व्यवसाया सोबतचं पर्यावरणप्रेमी ही त्यांची ओळख त्यांना इतरांपासून वेगळं ठरवते. निसर्गाचं देखणं सौंदर्य जपणे ही आपली जबाबदारी असल्याच त्यांनी जाणलं होतं. त्यामुळेच त्यांनी नाशिक जिल्ह्यातील पाथरे गावातील डोंगराळ भागात औषधी वनस्पतींची मोठ्या संख्येने लागवड केली. महाराष्ट्रातली अनेक भागांमध्ये त्यांनी 60 लाखांहून अधिक झाडे लावली. 100 ते 150 टेकड्यांचे त्यांनी औषधी वनस्पतींमध्ये रुपांतरण केले आहे.

ओडिसा येथील चिल्का सरोवर हे जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी विठ्ठल कामत यांनी डॉल्फिन ऑबझर्वेटरी सेंटरची स्थापना केली. त्याच बरोबर मुंबई यथील ऑर्किड हॉटेल आणि किल्ले जाधवगड येथे आई या नावाचे संग्रहालय त्यांनी उभे केले आहे. या संग्रहालयात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू ठेवून पर्यावरणाला पुरक उपक्रम पार पडतात. विशेष बाब म्हणजे ऑर्किड हॉटेल जवळ त्यांनी एक पोपट गल्ली तयार केली आहे. येथे पोपटसह इतर अनेक पक्षी आपल्याला पहायला मिळतात.

अनेक पुरस्कारांवर उमटवली आपल्या नावाची मोहर

विठ्ठल कामत यांच्या हॉटेल व्यवसायाची पाळेमुळे आज जगाच्या कानाकोपर्‍यात पसरली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले आहे. विठ्ठल कामत यांना 110 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारांमध्ये प्रामुख्याने दलाई लामा यांच्याकडून मिळालेला गोल्डन पिकॉक पुरस्कार, इंडियन एक्पप्रेसचा सर्वोत्कृष्ट सीईओ पुरस्कार, राजीव गांधी पुरस्कार, 2010 मध्ये ग्रीन हॉटेलीयर पुरस्कार, 2012 मध्ये जर्मनीची जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक नामांकित पुरस्कारांवर विठ्ठल कामत यांनी आपल्या नावाची मोहर उमटवली आहे.

विठ्ठल कामक यांच्यावर सध्या ‘हॉटेल आणि रेस्टॉरेंट असोसिएशन ऑफ इंडिया’ च्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्याच बरोबर अनेक शैक्षणिक, औद्योगिक समितीवर सल्लागार म्हणून ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. विठ्ठल कामत यांनी आपला संपूर्ण जीवन प्रवास ‘इडली ऑर्किड आणि मी’, ‘यश, अपयश आणि मी’ आणि उद्योजक होणारच मी या पुस्तकांच्या माध्यमातून जगासमोर आणाल आहे. त्यामुळे ही पुस्तके आवर्जून वाचा.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment