मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्य या सर्व गोष्टींचं नित्यनियमाने पालन केलं की, त्याची गोडं फळं लेट पण थेट चाखता नक्की येतात. याचा चांगला परिणाम स्वत:पुरता किंवा कुटुंबापुरता मर्यादित न राहत सर्वदुर पाहायला मिळतो. याची प्रचिती वाई तालुक्यातील बोरगाव खुर्द गावात आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाकडून (ICAI) सप्टेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि अंतिम सीए परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. बोरगाव खुर्द गावची कन्या अंजली राजेंद्र शिंदे हिने ही परीक्षा उत्तीर्ण केली असून, आपल्यासोबत आपल्या गावाची मान तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात अभिमाने उंचावली आहे. बोरगाव खुर्द गावातील पहिली CA होण्याचा बहुमान तिने पटकावला आहे. त्यामुळे संपूर्ण गावात दिवाळीनंतरही आनंदाचे फटाके फुटले.
चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा ही देशातील अत्यंत कठीण व प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते. अनेक टप्प्यांमधून पार पडणाऱ्या या परीक्षेत अंजलीने दाखवलेली चिकाटी, ध्येयवेड आणि परिश्रम कौतुकास्पद आहेत. अंजली ही न्यू इंग्लिश स्कूल, बोरगावचे माजी विद्यार्थी राजेंद्र दिनकर शिंदे आणि आई लक्ष्मी राजेंद्र शिंदे यांची कन्या असून तिच्या या यशामुळे कुटुंबासह गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. मुलीच्या या यशामुळे आई-वडिलांचा उर नक्कीच भरून आला असावा. अंजलीचे यश फक्त गावापुरते मर्यादित नाही. तर तालुक्यात आणि जिल्ह्यातील अनेकांना तिच्या यशामुळे प्रेरणा मिळणार आहे. तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत अनेक विद्यार्थी आता उच्च शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्राकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिंदे कुंटुंबात सध्या आनंदाचे आणि नवचैत्यन्याचे वातावरण आहे. गावातील नागरिक, शिक्षकवर्ग आणि नातेवाईकांनी अंजलीचे तोंडभरून कौतुक केले आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.
Best Website For Job Search लगेच क्लिक करा आणि तुमच्या हक्काचा जॉब शोधा!
ICAI सप्टेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल 24.66 टक्के इतका लागला आहे. तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल 9.45 टक्के आणि फाउंडेशन परीक्षेचा निकाल 15 टक्के इतका लागला आहे. या परीक्षेमध्ये मध्य प्रदेशच्या धमनोड येथील मुकुंद अगिवालने 500 गुणांसह 83.33 टक्के मिळवत देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर 492 गुणांसह 82 टक्के मिळवत हैदराबादचा तेजस मुंदडा आणि तिसऱ्या क्रमांकावर 489 गुणांसह 81.50 टक्क्यांनी बकुल गुप्ता यांची बाजी मारली आहे.