वाई (Wai) पंचायत समितीच्या किसन वीर सभागृहात सोमवारी (13 ऑक्टोबर) उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती (Wai Panchayat Samiti Election) गणाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. सध्यस्थितीत वाई तालुक्यात चार गट व अभेपुरी, यशवंतनगर, केंजळ, ओझर्डे, भुईंज, पाचवड, बावधन आणि शेंदुरजणे हे आठ गण आहेत. या आरक्षण सोडतीत बावधन आणि अभेपुरी गण सर्वसाधारण श्रेणीत घोषित झाले असून, सभापतीपद सुद्धा सर्वसाधारण श्रेणीत घोषित झाले आहे.
अभेपुरी गणातून बोरगाव गावचे सुपुत्र पंकज वाडकर यांच्या नावाची सध्या चर्चा होत आहे. समाजकार्य आणि क्रिकेटच्या माध्यमातून सक्रिय असल्यामुळे त्यांची एक ओळख समाजात निर्माण झाली आहे. स्थानिक क्रीडा उपक्रमांमध्ये, विविध स्पर्धांमध्ये पंकज वाडकर यांचा सहभाग असल्यामुळे तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक पातळीवरील राजकीय हालचालींचा आता वेग आला आहे. नागरिकांचा कल समाजकार्याशी जोडलेल्या आणि स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या व्यक्तींना संधी मिळावी, असा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तशा चर्चा सुद्धा आता चौकाचौकांमध्ये रंगताना दिसत आहेत. पंकज वाडकर यांच्या नावावर चर्चा सुरू असली, तरी अधिकृत उमेदवारीची घोषणा अद्याप झालेली नाही.
दरम्यान, पंचायत समितीचे सभापतीपदही सर्वसाधारण श्रेणीत घोषित झाल्याने अभेपुरी गणातील संभाव्य उमेदवारांसाठी संधी वाढली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. अभेपुरी गणात येत्या काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसत असून, उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.