Wai News – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाई पालिकेवर सवाल; 40 कोटींचा बोजा, कर्मचाऱ्यांचे पगार रखडले – तेजपाल वाघांचा निशाणा

वाई (Wai News) येथे होणाऱ्या लघु कुंभमेळा 2026 च्या पार्श्वभूमीवर वाई नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. देशावर आर्थिक संकट असल्याचे सांगत खर्च कमी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असताना, वाई नगरपालिकेवर तब्बल 40 कोटी रुपयांचा बोजा असल्याची बाब वारंवार पुढे येत आहे.

कोणतेही विकासकाम घेऊन गेल्यास ‘पालिकेवर 40 कोटींचा बोजा’ हे कारण पुढे केले जाते. मात्र त्याचवेळी मोठ्या प्रमाणावर लघु कुंभमेळ्यासारख्या इव्हेंटचे आयोजन कसे आणि कोणत्या नियोजनातून केले जाणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सांस्कृतिक विभाग राज्यप्रमुख तेजपाल वाघ यांनी प्रशासनावर निशाणा साधला आहे. या व्हिडीओनंतर अनेक व्यापाऱ्यांनी संपर्क साधत, प्रत्येक कार्यक्रमावेळी देणगीसाठी व्यापाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याची तक्रार केली.

 

याचबरोबर सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा पगार रखडल्याची बाब समोर आली आहे. “आमचं हातावरचं पोट आहे, पगार कसा मिळणार?” असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर खर्चाचे प्राधान्य काय असावे, यावरून वाद निर्माण झाला असून प्रशासनाने यावर स्पष्ट भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment

error: Content is protected !!