Wai News – वयगांवचा मान उंचावला! संतोष केळगणे यांना राज्यस्तरीय पुरस्कार; रंगरेषांतून उभा केला कलेचा अनोखा ठसा

वाई (Wai News) तालुक्यातील वयगाव गावचे सुपुत्र, उत्तम चित्रकार आणि समाजशील व सहकार्यशील व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले संतोष मारुती केळगणे यांना कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे स्पंदन फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे गावासह संपूर्ण वाई तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संतोष केळगणे हे वॉल पेंटिंग, लाईव्ह चित्रकला आणि विविध प्रकारच्या पेंटिंगमध्ये पारंगत आहेत. त्यांच्या भित्तीचित्रांमध्ये आकर्षक रंगसंगतीसोबत सामाजिक संदेशही पाहायला मिळतो. सार्वजनिक ठिकाणी त्यांनी साकारलेली चित्रे लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि परिसराला एक वेगळी ओळख देतात. त्यांच्या कलेमुळे अनेक ठिकाणी सौंदर्यवर्धनासोबतच जनजागृतीचे कामही झाले आहे.

आपल्या मेहनतीच्या जोरावर संतोष केळगणे यांनी अल्पावधीतच कलाक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांसह विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत असून पुढील काळातही ते असेच उल्लेखनीय कार्य करत राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!