Paragliding World Cup Panchgani – सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये रंगणार थरार; 25 देशांमधील 200 स्पर्धकांचा सहभाग

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये फिरण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक हजेरी लावत असतात. पाचगणी आणि महाबळेश्वर ही पर्यटकांची आवडीची ठिकाण. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणारी ही ठिकाणं सध्या Paragliding World Cup Panchgani मुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. भारतात प्रथमच या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्यातल्या त्यात पाचगणीमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील यांच्या हस्ते रविवारी (15 फेब्रुवारी 2026) या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आहे.

राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन संचालनालय आणि पाचगणीतील हाय फ्लाय पॅराग्लायडिंग यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युरोपची मक्तेदारी मोडून काढत यंदा प्रथमच भारताला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले असून या स्पर्धेत 25 देशांमधील 200 नामांकित आणि अनुभवी पॅराग्लायडर्स आपलं नशीब आजमावणार आहेत. 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत ही थरारक स्पर्धा सह्याद्रीच्या कुशीत रंगणार आहे. या स्पर्धेमुळे पाचगणी आता जागतिक ‘पॅराग्लायडिंग हब’म्हणून उदयास येईल, अशा भावना खासदार नितीन पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केल्या.

Paragliding World Cup म्हणजे काय ? What Is Paragliding World Cup

Paragliding World Cup ही पॅराग्लायडिंग खेळातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. जगभरातील अव्वल पायलट्स ठराविक टप्प्यांमध्ये (स्टेजेस) भाग घेतात आणि वेग, अंतर, तसेच दिलेल्या मार्गाचे अचूक पालन या निकषांवर गुण दिले जातात. प्रत्येक स्पर्धा साधारणपणे डोंगराळ भागात किंवा थर्मल्स चांगले मिळणाऱ्या ठिकाणी आयोजित केली जाते, जेणेकरून पायलट्सना जास्तीत जास्त उंची आणि लांब उड्डाण साधता येईल.

या स्पर्धेत वैयक्तिक तसेच संघ गट अशा दोन्ही प्रकारात निकाल जाहीर केले जातात. वर्षभरात वेगवेगळ्या देशांमध्ये होणाऱ्या फेऱ्यांमधील एकूण गुणांच्या आधारे अंतिम विजेते ठरतात. हवामान, वाऱ्याचा वेग, आणि नैसर्गिक परिस्थिती यामुळे प्रत्येक दिवस नवे आव्हान घेऊन येतो. त्यामुळे कौशल्य, रणनीती आणि सहनशक्ती यांची खरी कसोटी लागते.

पॅराग्लायडिंग वर्ल्ड कपमुळे या साहसी खेळाची लोकप्रियता वाढत असून नव्या पायलट्सना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळण्याची मोठी संधी उपलब्ध होते. हवेतील अचूक नियंत्रण आणि धाडस यांचा संगम असलेली ही स्पर्धा प्रेक्षकांसाठीही थरारक अनुभव ठरते

error: Content is protected !!