Mahabaleshwar Crime
आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आई-वडिलांचा आटापिटा सुरू असतो. त्यामुळे मुलांना घरापासून लांब ठेवणे असो किंवा महागड्या शाळेत प्रवेश मिळवून देणे असो. शक्य त्या सर्व गोष्टी आई-वडिलांच्या माध्यमातून मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी केल्या जातात. परंतु एवढं सगळं करूनही मुलांच्या सुरक्षिततेवरच गंडांतर येत असेल तर, मात्र मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण पाचगणीमधील एक शाळेत घडलेल्या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अल्पवयीन वर्गमित्रांनीच एका मुलाला विवस्त्र करुन त्याची रॅगिंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर बाब म्हणजे मुलं घाबरून पुण्याला पळून गेली होती.
पाचगणीत असणाऱ्या प्रसिद्ध शाळेमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. नववी इयत्तेत शिकणाऱ्या एका 14 वर्षांच्या मुलासोबत हा सर्व प्रकार घडला आहे. पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर मुलांनी आपल्या आई-वडिलांना दिलेल्या माहितीनुसार, 23 जून रोजी रात्री साडेआठ वाजता दोन मुलांनी त्यांना विवस्त्र केलं. तेव्हा इतर मुलेही तिथे उपस्थित होती. ते दोघेजण त्यांना लाथा मारून हसत होते. त्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती शाळेत सांगितल्याचे मुलांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा एकदा 6 जुलै रोजी असाच प्रकार घडला. पँट काढली नाही तर मारहाण करण्याची धमकी त्यांना देण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या मुलांनी 10 जुलै रोजी शाळेतून पळ काढत पुणे गाठलं आणि वाटेत जात असताना पालकांना सर्व माहिती दिली.
या सर्व घटनेमुळे मुलं घाबरली असून पालकांमध्ये संतापाची भावना आहे. या प्रकाराची माहिती तत्काळ पालकांनी पाचगणी पोलिसांना दिली. पाचगणी पोलिसांना पालकांचा जबाब नोंदविला आणि त्यानंतर सोमवारी (15 जुलै 2025) हे प्रकरण बाल न्यायालयात पाठविण्यात आले आहे.