Good Touch And Bad Touch
महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन महिन्यांच्या चिमुरडीवरी अत्याचार करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एकंदरीतच स्त्रियांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा देशात निर्माण झाला आहे. कधी कोणावर वाईट वेळ येईल, हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे स्वसंरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. लहाणांपासून मोठ्यापर्यंत कोणीच सुरक्षित नाही. त्यामुले कराटे क्लासेस, स्वसंरक्षणासाठी पेपर स्प्रे सारख्या गोष्टी सोबत बाळगणे महत्त्वाचे झाले आहे. परंतु या सर्व गोष्टी लहान मुलांना हाताळण्यायोग्य नाहीत. त्यामुळे 1 ते 10 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना कशा पद्धतीने स्वसंरक्षणाचे धडे द्यायचे? असा प्रश्न पालकांसह सर्वांच्याच मनात निर्माण होत असावा. काही शाळांमध्ये चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातला फरक मुलांना समजावून सांगितला जातो. परंतु बऱ्याच शाळांमध्ये या सर्व गोष्टी शिकवल्या जात नाहीत. लहाण मुलांना या गोष्टी कशा शिकवायच्या अशा प्रश्न पालकांपुढेही निर्माण होतो. त्यामुळेच हा ब्लॉग लिहण्यात आला आहे.
काही मुलभुत गोष्टी समजून घेणे गरजेचे
सर्व प्रथम मुलांशी थेट चर्चा करण्यापूर्वी, पालकांनी किंवा शिक्षकांनी चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यांच्यातील फरक स्वत: समजून घेणे गरजेचे आहे. तरच आपण आपल्या मुलांना याची चांगली माहिती देऊ शकतो.
- चांगला स्पर्श म्हणजे असा स्पर्श जो मुलाला सुरक्षित आणि प्रेमळ वाटते, जसे की कुटुंबाकडून मिठी मारणे, विश्वासू व्यक्तीचा हात धरणे किंवा पाठीवर थाप देणे.
- वाईट स्पर्श हा असा स्पर्श असतो जो चुकीच्या पद्धतीने केला जातो आणि ज्यामुळे मुलांच्या मनात भीती निर्माण होते, अस्वस्थ किंवा अस्वस्था वाटते.
वातावरण निर्मिती करा
मुले जेव्हा सुरक्षित आणि ऐकांतात असतात तेव्हा ते विविध प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांच्याशी मोकळ्या मनाने संवाध साधा. त्यांचे मित्र होण्याचा प्रयत्न करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या प्रश्नांना हलक्यात न घेता गांभिर्याने त्या प्रश्नांची उत्तरे द्या.
- निर्णय न घेता प्रश्नांना प्रोत्साहन देणे.
- जेव्हा ते अनुभव शेअर करतात तेव्हा त्यांचे सर्व बोलणे नीट ऐका.
- मुलं सर्व गोष्टी तुम्हाला सांगतात, त्यामुळे तुमचे आणि मुलाचे नाते बळकट होते.
यामुळे मुलांमध्ये आपल्या प्रती विश्वासाची भावना निर्माण होते.
वयानुसार योग्य धडे देण्यास आत्ता पासूनच सुरुवात करा
लहान मुले वयात येत असताना त्यांच्यामध्ये अमुलाग्र बदल होत असतात. त्यामुळे त्यांची भाषा आणि समजून घेण्याची संकल्पना यानुसार मुलांच्या वय आणि परिपक्वता पातळीनुसार स्वत:ला जुळवून घ्या. टप्याटप्याने मुलांना अवयवांची माहिती करून द्या.
- लहान मुलांना त्यांना शरीराच्या अवयवांची योग्य नावे शिकवा. तसेच त्यांना शरीराच्या खाजगी भागांची योग्या कल्पना करून द्या. काही शरीराचे अवयव खाजगी असतात आणि त्यांना इतरांनी स्पर्श करू नये हे त्यांना समजावून सांगा. आई-वडील आणि त्यांच्या व्यतिरिक्त तुमच्या विश्वासातील व्यक्ती स्वच्छताविषयक कामांसाठी मुलांच्या खाजगी अवयवांना स्पर्श करू शकतात, हे सुद्धा मुलांना समजावून सांगा.
- चांगल्या आणि वाईट स्पर्शाच्या संकल्पनांचा विस्तारीत स्वरुपात सांगा. या कल्पनांना बळकटी देण्यासाठी वास्तविक जीवनातील उदाहरणे देण्यास प्राधान्य द्या.
- कोणाला संमती द्यायची आणि कोणापासून अंतर ठेवायाचे यावर अधिक स्पष्टपणे चर्चा करा.
सोपी आणि स्पष्ट भाषा वापरा
चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल चर्चा करताना, भाषा स्पष्ट, सोपी आणि मुलांना समजेल त्यांना ऐकताना आनंद वाटेल, अशी असावी. “कोणीही तुम्हाला स्पर्श करू नये” असे सांगण्याऐवजी, पालकांच्या उपस्थितीत तपासणी दरम्यान डॉक्टर किंवा स्वच्छतेच्या गरजांमध्ये मदत करणारे विश्वासू प्रौढ या व्यक्ती स्पर्श करू शकतात हे समजावून सांगा. त्याचबरोबर वाईट स्पर्श नेहमीच चुकीचा असतो यावर जोर द्या.
मुलांना नाही बोलायला शिकवा
त्यांचे शरीर त्यांचे आहे आणि त्यांना अस्वस्थ करणाऱ्या कोणत्याही गोष्टीला “नाही” म्हणण्याचा अधिकार मुलांना आहे, ही गोष्ट त्यांना समजावून सांगा. त्यासाठी त्यांना तुमच्या पद्धतीने काही सोप्या शब्दात वाक्य शिकवा. बऱ्याच वेळा मुले घाबरून मोठ्या व्यक्तींना नाही म्हणायला घाबरतात. चुकीचा स्पर्श जाणवत असेल तर मुलांना नाही म्हणता आलं पाहिजे. ये तितक सोप्प नसल तरी अवघडही नाही.
– “मला ते आवडत नाही. कृपया थांबा.”
– “नाही, मला माझी जागा हवी आहे.”
– “त्यामुळे मला अस्वस्थ वाटते.”
प्रौढांनाही ठामपणे नाही म्हणता यायला हवे. स्वतःचे रक्षण करताना नाही म्हणणे म्हणजे त्यांचा अपमान करणे, असे होत नाही. ही गोष्ट सुद्धा पालकांनी मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे.
आपलं कोण आणि परक कोण यातला फरक समजावून सांगा
मुलांना आपल्या आयुष्यातील विश्वासू व्यक्तींना ओळख करून देण्यास मदत करा. यामुळे अशा व्यक्तींकडे मुलांना सुरक्षित वाटू शकते. या विश्वासू व्यक्तींमद्ये पालक, शिक्षक, शाळेतील सल्लागार किंवा जवळच्या नातेवाईकांचा समावेश असू शकतो. त्यांना शिकवा की परिस्थिती काहीही असो, या व्यक्ती तुमची मदत करण्यासाठी नेहमी तत्पर आहेत.
पुस्तके, व्हिडिओ यांची मदत घ्या
पुस्तके, व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श शिकवा. अशा पद्धतीने अनेक व्हिडिओ आणि पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे मुलांना अशा गोष्टी समजायला सोप्या जातात.
– जिल स्टारिशेव्हस्की यांचे “My body belongs to me” किंवा “The Safe Touch Coloring Book” सारखी पुस्तके
– शरीराच्या सुरक्षिततेवर भर देणारे YouTube Kids सारख्या प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी योग्य व्हिडिओ उपलब्ध आहेत.
“No, Go Ahead, Tell Me.” हा नियम शिकवा
हा सोपा, कृतीशील नियम मुलांना असुरक्षित परिस्थिती हाताळण्यास सक्षम करतो:
No – कोणत्याही वाईट स्पर्शाला किंवा चुकीच्या वाटणाऱ्या परिस्थितीला नाही म्हणायाल शिकवा.
Go Ahead – शक्य तितक्या लवकर परिस्थितीतून स्वतःला दूर करण्यास शिकवा.
Tell Me – काय घडले याबद्दल एखाद्या विश्वासू प्रौढ व्यक्तीला लगेच सांगितले पाहिजे, ही गोष्ट मुलांना शिकवा.
हा नियम मुलांना आवर्जून शिकवा. यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने बदल करू शकता किंवा काही संकेतांक वापरून मुलांना या गोष्टी समजावून सांगु शकता. तसेच या गोष्टीचा नियमीत सराव करा म्हणजे मुलांना हे कायमस्वरुपी लक्षात राहील.
मुलांच्या मनातील गैरसमज दूर करा
मुलांना सुरक्षिततेबद्दल गैरसमज असू शकतात, जसे की वाईट स्पर्श फक्त अनोळखी लोकांकडूनच येऊ शकतो. त्यांना शिकवा काही वेळा विश्वासू व्यक्ती सुद्धा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करू शकतो. (अशी काही प्रकरणे घडली आहेत)
– बहुतेक असुरक्षित परिस्थितींमध्ये त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीचा समावेश असतो.
– जर कोणी त्यांना अयोग्यरित्या स्पर्श केला तर ती त्यांची चूक नसते, हे मुलांना समजावून सांगा. अन्यात याचा मुलांच्या मनावर विपरित होऊ शकतो.
– जरी जबाबदार व्यक्तीने किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तीने चुकीचा स्पर्श केला असेल, ते सत्य सांगता आले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना काही गोष्टी शिकवा.
वास्तविक जीवनातील परिस्थितींचा सराव करा
कृती करून दाखवल्यामुळे मुलांना वाईट स्पर्श कशा पद्धतीने केला जातो, याची माहिती होते. मुलांना वास्तववादी परिस्थिती तयार करा. बऱ्याच वेळा मुलांना जवळच्या व्यक्तींकडून मिठी मारली जाते. परंतु कोणाला कसा प्रतिसाद द्यायचा याचे मार्गदर्श मुलांना करा.
नियमित सराव करा
शरीर सुरक्षेच्या चर्चा ही वेळोवेळी करत चला. मजेशीर पद्धतीने नियमीत सराव केल्यास मुलांनाही या गोष्टी पटकन समजण्यास मदत होते आणि ते सुद्धा चांगला प्रतिसाद देतात. मुलांची समजून घेण्याची क्षणता हळुहळु विकसित होते, म्हणून आवश्यकतेनुसार संभाषणावर भर द्या.
प्रश्नांना योग्य आणि मुलांना समजेल अशा स्वरुपात उत्तर द्या
जर एखाद्या मुलाने एखादी गोष्ट सांगितली किंवा प्रश्न विचारला तर, त्या प्रश्ना शांतपणे उत्तर द्या. प्रश्न गंभीर असेल तर त्यांच्या मनात भीती निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधा. आवश्यक असल्यास, जवळच्या व्यक्तीशी किंवा अधिकाऱ्यांच्या मदतीने परिस्थिती हाताळण्यासाठी पुढील कारवाई करा.
मुलांचे हावभाव ओळखायला शिका
जर एखाद्या मुलाला वाईट स्पर्शाचा अनुभव आला असेल, तर मुलांच्या स्वभावात फरक जाणवतो. जसे की, संबंधित व्यक्तीपासून दुर जाणे, विशिष्ट व्यक्तींना टाळणे, त्यांना पाहताच रडणे किंवा इतर गोष्टी यासारखी लक्षणे दिसू शकतात. मुलांच्या वर्तनातील बदलांकडे काळजीपूर्वीक लक्ष द्या. मुलं आपल्या वर्तनातून बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असताता. आपल्यालाही त्या गोष्टी समजून घेता यायला हव्यात.
मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल शिकवणे हे केवळ त्यांचे संरक्षण करण्याबद्दलच नाही तर, ती काळाजी गरज आहे. विश्वास, आदर आणि मुक्त संवादाचे वातावरण निर्माण करून, आपण मुलांना सुरक्षितपणे सर्व गरजेच्या गोष्टी समजावून सांगु शकतो. त्यामुळे आजपासूनच आपल्या मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातला फरक समजावून सांगण्यास सुरुवात करा.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.