पुस्तकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर (Mahabaleshwar News) तालुक्यातील भिलार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या रॅलीत महिला, युवक, कार्यकर्ते तसेच विविध घटकांतील नागरिक सहभागी झाले होते. “लाडक्या बहिणी” योजनेच्या पार्श्वभूमीवर महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. रॅलीमुळे परिसरातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या भिलार गणातील उमेदवार वंदना भिलारे यांच्या समर्थनार्थ ही रॅली आयोजित करण्यात आली होती. राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मकरंद आबा पाटील यांच्या उपस्थितीत वंदना भिलारे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. पुस्तकांच्या गावातील सुशिक्षित मतदार तसेच ग्रामीण भागातील नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही नमूद करण्यात आले.
ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करत घोषणाबाजी व टाळ्यांच्या गजरात रॅलीचा उत्साह वाढवला.यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी विकासकामांचा उल्लेख करत, मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून या भागात विविध कामे झाल्याचा दावा केला. भिलार गणातून पंचायत समितीसाठी पहिल्यांदाच महिला उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे सांगत, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वंदना भिलारे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी सातारा जिल्ह्यासह जावळी–महाबळेश्वर तालुक्यात राबवलेल्या योजनांचा प्रभाव या निवडणुकीत दिसून येत असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर वंदना भिलारे निवडणुकीच्या मैदानात उतरल्या असून मतदारांकडून त्यांना प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.
रॅलीदरम्यान रस्ते, पाणीपुरवठा, पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगार निर्मिती यासारख्या मुद्द्यांवर भर देण्यात आला नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही वंदना भिलारे यांनी दिली.

