Morgiri Fort – चला किल्ले मोरगिरीकडे! लोणावळ्याच्या कुशीत असलेला एक सुंदर दुर्ग, वाचा संपूर्ण माहिती

पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा सह्याद्रीत भटकणाऱ्यांसाठी तिन्ही ऋतु सारखेच. तरीही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सह्याद्रीच सैर करण म्हणजे थेट स्वर्गात जाऊन पुन्हा माघारी येण्यासारखंच. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा अतिरेक झाल्यामुळे डोंगर दऱ्यांमध्ये, किल्ल्यांवर तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने जाऊ लागले आहेत. तुम्ही सुद्धा ट्रेकिंगला जाण्याच्या विचारात आहात, पण कुठे जायंच हे समजत नाहीये. तर तुमच्यासाठी पुण्यातील लोणावळ्यामध्ये ट्रेकिंगचा एक चांगला पर्याय म्हणजे Morgiri Fort होय.

पुणे जिल्ह्यात असंख्य किल्ले आहेत. त्यातल्या त्यात लोणावळ्यामध्ये कोरीगड, तुंग, घनगड, तिकोना, राजमाची असे अनेक किल्ले या परिसरामध्ये आहेत. याच परिसरात आणखी किल्ला तुमची वाट पाहतोय, तो म्हणजे किल्ले मोरगिरी. मोरगिरी किल्ल्यावर जाण्यासाठी थरारक ट्रेकिंग करत तुम्हाला गडावर जावं लागणार आहे. कारण गडावर जाणाऱ्या पायऱ्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी एक लोखंडी शिडी बसवली आहे. तुम्ही पहिल्यांदाच गडावर जाणारा असाल तर तुमच्यासाठी हा गड नाही. या गडावर जाण्यासाठी तुम्हाला जाणकारांची मदत लागणार आहे. कारण गडावर जाताना दोन ठिकाणी अवघड कातळ कडा आणि या ठिकाणाहून वर जाताना सुरक्षेसाठी रोप वापरण्याचा सल्ला दिला जातो.

मोरगिरी किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे कोणती आहेत?

  • गडावर स्वराज्याचा भगवा झेंडा
  • गडावर जाताना वाट ही दाट कारवीच्या रानातून जाते
  • पाहण्यासारख्या अशा कातळ भिंती
  • कातळात कोरलेल्या पायऱ्या
  • जाखादेवीचे ठाणे
  • पाण्याच टाकं आहे (पिण्यायोग्य नाही)
  • गडाच्या माथ्यावर उद्ध्वस्त स्वरुपात काही वास्तुंचे अवशेष आहेत

 

गडावरून कोणकोणत्या किल्ल्यांच दर्शन होतं?

गडावरून गडाच्या आजूबाजूच्या परिसरात असणारे काही किल्ले लक्ष वेधून घेतात. गडाच्या पायथ्याला पोहोचल्यानंतर तुम्हा तुंग किल्ला, तिकोना, आणि कोरीगड हे किल्ले पाहायला मिळतात. त्याचबरोबर पवना धरणाचे बॅकवॉटर सुद्धा पाहायला मिळते.

गडावर राहण्याची, जेवणाची सोय आहे का?

गडावर राहण्याची किंवा जेवणाची सोय नाही. तसेच गडावर पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. गडावर पाण्याच टाकं आहे. परंतु ते पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे गडावर जाताना शक्यतो सोबत पाण्याची बॉटल आणि जेवणासाठी लागणारे पदार्थ सोबत ठेवावे (गडावर कचरा करू नये)

गडावर जायचं कसं?

गडावर जाण्यासाठी तुम्ही मुंबई किंवा पुण्याहून येणार असाल किंवा इतर कोणत्या जिल्ह्यातून येणार असाल तर तुम्हाला लोणावळा हे जवळचं रेल्वे स्थानक आहे. जर तुम्ही खासगी गाडी घेऊन येणार असाल तर, तुम्ही लोकेशनच्या मदतीने अॅम्बी व्हॅली मार्गे गडावर जाऊ शकता. गाडी गडाच्या पायथ्यापर्यंत जाते. गडाच्या पायथ्याला जांभुळणे हे गाव आहे. या गावात गाडीने जाता येत. गडावर जाण्यासाठी साधारण जांभुळणे गावातून तीन तास लागतात.