Nhavigad Fort – शिवरायांच्या स्वराज्यातील एक देखणा गड

स्वराज्य उभारणीत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या अनेक गडांच महत्त्वाच योगदान आहे. मात्र, सोशल मीडियाच्या विश्वात गुंतलेल्या तरुणाईला या गडांबद्दल फारसे माहित नाही. राजगड, लोहगड, तोरणा, रायगड या ठराविक गडांव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये अनेक छोटे मोठे गड आपलं अस्तित्व टिकवून आजही उभे आहेत. असाच एक नाशिक जिल्ह्यातील गड म्हणजे Nhavigad Fort होयं.

सह्याद्री पर्वताच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणमधून होते. या रागांना एका विशिष्ट नावाने संबोधले जाते. या दोन्ही रागांवर गडकिल्ले आहेत. उत्तरेकडून सुरू होणाऱ्या या सह्याद्रीच्या रांगेत सेलबारी आणि डोलबारी अशा नावांनी ओळखलं जातं. सेलबारी रांगेवर असणाऱ्या गडांमध्ये मांगीतुंगी सुळके आणि न्हावीगडाचा समावेश आहे. डोलबारी रांगेवर साल्हेर, मुल्हेर, हरगड, सालोटा आणि मोरगड या गडांचा समावेश आहे.

या गडांचे प्रत्येकाचे काही ना काही वैशिष्ट्य आहे. या सर्व गडांच्या निश्चित स्थानाचा विचार केला तर, हे सर्व गड पश्चिमेकडे असणाऱ्या गुजरातमधील घनदाट जंगलात दडून बसलेल्या डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण प्रदेश यांच्या सीमेवर आहेत. न्हावीगडाचे वैशिष्ट्य म्हणजे या गडावर एक नेढे आहे. तसेच न्हावीगडाचा उल्लेख रतनगड या नावाने सुद्धा केला जातो.

न्हावीगड आणि इतिहास

न्हावीगडाचा इतिहासात उल्लेख करण्यात आला अशून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात गड होता, याची इतिहासात नोंद आढळून येते. त्याच बरोबर इसवी सन 1431 साली अहमदशहा बहमानी व गुजरातचा सुलतान यांचे सैन न्हावीगडाच्या पायथ्याशी भिडले होते. दोन्ही सैन्यांमध्ये तुंबळ युद्ध झाले होते. शक्य तितका सर्व जोर दोन्ही बाजूच्या सैनिकांनी लावला होता. मात्र, दोघांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने रात्रीच्या अंधारात दोन्ही बाजूच्या सैनिकांनी संधी साधत पळ काढला होता. पुढील काळात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य विस्तार करायला घेतला तेव्हा न्हावीगड जिंकून घेतला होता. शिवकालीन कागदपत्रांमध्ये न्हावीगडाचा उल्लेख नाहावागड असा करण्यात आल्याची नोंद आढळून येते.

गडावर पाहण्यासारखे काय आहे

न्हावीगड तसा चढण्यास सोपा गड आहे. परंतु गडाचा शेवटचा टप्पा थरारक आहे. त्यामुळे गडावर जाण्याचा उत्साह अधिक वाढतो. गडावर जाण्याची वाट गडाच्या उत्तर सोंडेवरून सुरू होते. सोंडेच्या पायथ्याला वाघदेवाचे ठाणे आहे. त्या ठिकाणी एक लाकडी पट्टी पाहताच आकर्षीत करते. या पट्टीवर सूर्य, चंद्र, वाघ आणि नागाची प्रतिकृती कोरलेली आहे. कलेचा अद्भूत नमुना या ठिकाणी पहायला मिळतो. याच लाकडी पट्टीच्या बाजूला काही शीळ पडलेल्या आढळून येतात.

वाघदेवाचे दर्शन घेतल्यानंतर गडाच्या दिशेने मार्गस्थ व्हावे. इथून 15 मिनिटे चालत गेल्यानंतर एका झाडावर भगवा झेंडा लावलेला दिसतो. त्याच झाडाच्या अगदीच समोर कातळात सप्तश्रृंगी देवीचे शिल्प कोरलेले आहे. या देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला पाण्याची टाकी आहेत. परंतु सध्या त्या टाक्यांमध्ये पाणी आढळून येत नाही. दोन्ही टाकी बुजलेली आहेत. याच मार्गे पुढे गेल्यानंतर वाटेत अजून तीन ते चार पाण्याची टाकी नजरेस पडतात. या चारही पाण्याच्या टाक्या कातळात कोरलेल्या आहेत.

Ghangad Fort – महिला कैद्यांना या गडावर कैद केलं होत, वाचा या अपरिचित गडाचा इतिहास…

चार टाक्या पार केल्यानंतर पुढे गेल्यावर दोन उद्ध्दस्त बुरूज लागतील. बुरूजाची रचना पाहता या ठिकाणी पूर्वी शंभर टक्के चांगल्या स्थितीत दरवाजा असावा. छोटे मोठे टप्पे पार केल्यानंतर आपल्याला आणखी काही पाण्याच्या टाक्या लागतात. पाय तुडवत असंच चालत राहिल्यानंतर आपण गडावर जाणाऱ्या पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो. गडावर प्रवेश करताना एक मोठ्या आकाराच चौकोनी टाकं लागत. त्या टाक्याच्या पुढे एक पडलेल्या अवस्थेत अवसेष आढळून येतात. गडावर काही उद्ध्दस्त अवस्थेत घरांचे अवशेष आहेत. याचाच अर्थ गडावर वस्ती होती.

यानंतर गडाच्या दक्षिणेला असणाऱ्या गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाण्याचा मार्ग लागतो. हा एक प्रकारचा सुळका असून या सुळक्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणासाठी आवश्यक सामग्री सोबत असावी. या सुळक्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सुळक्यामध्ये एक नेढ तुम्हाला पहायला मिळणार आहे. तसेच या नेढ्याखाली एक पाण्याचे कोरडे टाके आहे. गडाचा माथा फार मोठा नाही. त्यामुळे साधारण 30 ते 40 मिनिटांत गडाचा माथा फिरून पूर्ण होतो. गडावरून चौफेर नजर फिरवल्यास दक्षिणेला मोरागड, हरगड, साल्हेर, सालोटा आणि मुल्हेर गडाचा परिसर आणि पूर्वेला मांगीतुंगी आणि तांबोळ्या गडाचा परिसर निदर्शनास येतो.

गडावर जायचे कसे

न्हावीगडावर जाण्यासाठी नाशिक-सटाणा या मार्गावर असणाऱ्या ताहराबाद या ठिकाणी तुम्हाला उतरावे लागणार आहे. ताहारबादहून भिलवड मार्गे मांगीतुंगीला जाणारा रस्ता पकडावा आणि याच मार्गे पुढे गेल्यानंतर तुम्हाला दोन फाटे फुटलेले दिसतील. रस्ता चांगला डांबरी आहे. याच ठिकाणी एक रस्ता मांगी तुंगी डोंगराच्या पायथ्याला घेऊन जातो. तर डावीकडे असणारा रस्ता न्हावीगडाच्या पायथ्याला असणाऱ्या पाताळवाडी पर्यंत जातो. पाताळवाडीतून एक वाट गडाच्या पठारावर गेली आहे. याच ठिकाणाहून म गडाच्या दिशेने रस्ता सुरू होतो. पायथ्याला असणाऱ्या पाताळवाडी गावातून गडावर जाण्यासाठी साधारण दीड ते दोन तास लागतात.

गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का?

गडावर जेवणाची कोणताही सोय नाही. त्यामुळे जेवणाची आपण आपली सोय करावी. त्याच बरोबर गडावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहेत. परंतु टाक्यांमध्ये असणारे पाणी पिण्यायोग्य आहे का नाही याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे पाणी पिण्यापूर्वी काळजी घ्या. टाक्यांमधील पाणी प्यायचे असेल तर पाणी उकळूनच प्या.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment