Pratapgad fort; अफझल्याचा माज छत्रपती शिवरायांनी उतरवला, आदिलशाहीला घडली मराठ्यांच्या मर्दुमकीची धसकी

शुरवीरांचा जिल्हा म्हणून सातारा प्रचलित आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील एक व्यक्ती Indian Army मध्ये देशाची सेवा करत आहे किंवा देशाची सेवा करुन निवृत्त झाला आहे. परंतु सातारा जिल्ह्याची ‘शुरवीरांचा जिल्हा’ ही ओळख फक्त या एकाच कारणामुळे पडलेली नाही. सातारा म्हणजे शिवशंभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली मऱ्हाट भूमी. जिल्ह्यातील अनेक मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली, वेळ प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. त्यामुळेच एक म्हण आजही प्रचलित आहे ती म्हणजे, “होता ‘जीवा’ म्हणून वाचला ‘शिवा’. हा प्रसंग ज्या गडावर घडला तो गड म्हणजे जावळीच्या किर्रर्र… जंगलात ताठ मानेने उभा असलेला प्रतापगड.

प्रतापगडाचा इतिहास / Pratapgad fort information in Marathi

प्रतापगड (Pratapgad fort information in Marathi) म्हणजे अफजलखानाचा वध आणि आदिलशाहीला घडलेली मराठ्यांच्या मर्दुमकीची धसकी. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋतेस 13 किमी. च्या अंतरावर घनदाट जंगलाच्या सानिध्यात प्रतापगड वसला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकले आणि प्रतापगड स्वराज्यात दाखल झाला. 1665 मध्ये मोरो त्रिंबक पिंगळे यांना किल्ला बांधून घेण्याची आज्ञा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली होती. त्याचबरोबर तुळजा भवानी मातेचे मंदिर सुद्धा शिवरायांनी गडावर स्थापले होते.

प्रतापगाडाचे ऐतिहासिक महत्व वाढले ते अफझलखान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट व त्या प्रसंगी अफझलखानाचा झालेला वध या घटनेमुळे. पैजेचा विडा उचलून आदिलशाही सेनापती अफझलखान शिवरायांविरुद्ध लढण्यासाठी मार्गस्थ झाला. शिवरायांनी आपल्या बुद्धीचातुर्याने अफझलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याला बोलावले. 10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या भेटीचा दिवस उजाडला. गुर्मीत असलेल्या अफझल्याचा माज छत्रपती शिवरायांनी उतरवला आणि 32 दातांच्या बोकडाचा शिवरायांनी कोथळा काढला. तेव्हापासून हा दिवस इतिहासात ‘अफझलखानाचा वध’ म्हणून ओळखला जाऊ लागला. यावेळी कोंढवली, ता.वाई गावचे सुपूत्र जिवा महाला यांनी जिवाची बाजी लावत शिवरायांचे प्राण वाचवत सय्यद बंडाचा काटा काढला.

अफझलखानाचा वध या घटनेव्यतिरिक्त छत्रपती राजाराम महाराज सुद्धा जिंजीस जात असताना प्रथम प्रतागडावर आले होते. त्याचबरोबर पेशवाईमध्ये नाना फडणीसाने प्रतापगडावर सखाराम बापूस 1778 साली काही दिवसांसाठी नजरकैदेत ठेवले होते. जेव्हा नाना फडणीसावर दौलतराव शिंदे व मंत्री बाळोबा कुंजीर चालून आले, तेव्हा नाना फडणीसाने 1796 मध्ये प्रतापगडाचा आश्रय घेतल्याची इतिहासात नोंद आहे. पुढे 1818 साली ब्रिटिश-मराठे यांच्यात झालेल्या युद्धानंतर प्रतापगड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.

प्रतापगडाची रचना

जावळीच्या घनदाट जंगलाने वेढलेला प्रतापगड तीन भागांमध्ये विभागलेला आहे. मुख्य किल्ला, माची आणि बालेकिल्ला हे प्रतापगडाचे मुख्य तीन भाग. प्रामुख्याने तलावांची संख्या मुख्य किल्ला व बालेकिल्ल्याच्या भागात जास्त प्रमाणात आहे. त्याचबरोबर संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूंस भक्कम तटबंदी व बुरुज आहे. मुख्य किल्ल्याचे क्षेत्रफळ 3,885 चौ.मी, तर बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ 3,660 चौ.मी आहे. तसेच दक्षिणेकडील बुरुज 10 ते 15 मी. उंचीचे आहेत. शासनाच्या माध्यमातून गडावर विविध कामे सध्या सुरू आहेत. गडावरील बुरुजांच्या अवशेषांचा विचार केला तर, गडावर सध्या अफझल, राजपहारा, रेडका, केदार इ. बुरुजांचे अवशेष टिकून आहेत. अफजलखानाच वध प्रतापगडाच्या पायथ्याशी करण्यात आला होता. त्यामुळे गडाच्या एका माचीवरुन अफजलखानाच थडग पाहता येत. त्यामुळे या बुरुजाला अफझलखान बुरुज म्हणतात. हा बुरुज निमुळत्या डोंगराच्या धारेच्या शेवटी आहे. अशाच प्रकारची माची आपल्याला राजगड (सुवेळा व संजीवणी) व तोरणा (झुंजार) गड आणि लोहगडावर (विंचूकडा) सुद्धा पाहता येते.

Pandavgad Fort; विराटनगरी वाईचा पहारेकरी

प्रतापगडावर पाहण्यासारखी ठिकाणे

प्रतापगडावर प्रवेश केल्यानंतर प्रामुख्याने दोन दरवाचे पार करावे लागतात. दोन दरवाजे पार केल्यानंतर डाव्या पायऱ्यांनी तुळजा भवानी मंदिराकडे जाता येते. तसेच सरळ अफझलखान बुरुजाच्या दिशेने सुद्धा जाता येते. अफझल बुरुजाच्या आग्नेयेस अफझलखानाची कबर आहे. उघड्या डोळ्यांनी ही कबर माचीवरुन सहज पाहता येते. 1661 साली मोरो त्रिंबक पिंगळे यांच्या हस्ते तुळजा भवानीचे मंदिर स्थापन करण्यात आले होते. विशेष म्हणजे भवानी मातेचे मुळ मंदिर हे फक्त दगडी गाभाऱ्याचे होतो. त्यामुळे 1820 साली सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी पुढाकार घेतला आणि तेथे लाकडी मंडप बांधला होता. मात्र हा मंडप आगीच्या कचाट्यात सापडून नष्ट झाला व तेव्हा मंदिरातील दागिन्यांची चोरी सुद्धा झाली होती. त्याचबरोबर औरंगबजेब जेव्हा दक्षिणेत आला होता, तेव्हा या मंदिराची काही प्रमाणात त्याने नासधुस केली होती. मात्र या मंदिराचा 1935 साली जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

गडावर असणारे भवानी मातेचे मंदिर, बुरुज याव्यतिरिक्त गडावर वेगवेगळ्या ठिकाणी तोफा विखुरलेल्या होत्या. मात्र आता या सर्व तोफा मंदिराच्या आवारात आणून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच तिसरा दरवाजा पार करून पुढे आल्यानंतर केदारेश्वराच्या मंदिरात जाता येते. विशेष बाब म्हणजे गडावरील दरवाजांवर शरभाच्या प्रतिमा पाहायला मिळतात. गडाच्या वायव्येला तटबंदीमध्ये बांधलेला रेडका बुरुज पाहता येतो. त्याचबरोबर गडाच्या उत्तरेकडील तटबंदीमध्ये आणि केदारेश्व मंदिरामागील तटबंदीमध्ये चोर दरवाजे आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळात प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 5 मी. उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. शिवरायांच्या या पुतळ्याचे अनावरण 1957 च्या नोव्हेंबर महिन्यात माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते.

प्रतापगडला जायचे कसे?

प्रतापगड प्रामुख्याने मुंबई पासून 218 किमी. अंतरावर, पुण्यापासून 139 किमी. अंतरावर आहे. मुंबईवरुन येणाऱ्या शिवप्रेमींसाठी पोलादपूर मार्गे प्रतापगडला जाणे सोईस्कर ठरू शकते. त्याचबरोबर पुण्यावरुन प्रतापगडला जाण्यासाठी वाईमार्गे महाबळेश्वरहून गडावर जाणे सोईस्कर ठरू शकते. दोन्ही बाजूंनी प्रतापगडला येताना कुंभरोशी हे गाव लागले. या गावाच्या हद्दीतून मुख्य रस्त्यावरुन एक रस्ता प्रतापगडाच्या दिशेने गेला आहे. इथून प्रतापगडला जाण्यासाठी अंदाजे अर्धातास लागू शकतो. येथे असणारं शिवकालीन खेडेगाव सुद्धा पाहण्यासारखं आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधील डोपऱ्या नाव असणाऱ्या एका टेंभावर प्रतापगडाची बांधणी करण्यात आलेली आहे.

प्रतापगड आणि रोचक माहिती

प्रतापगडाच्या संदर्भात अनेक रोचक तथ्य सांगितले जातात. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतापगड मुघलांना कधीही जिंकता आला नाही. त्याचबरोबर असेही सांगितले जाते की अफजलखानाचा कोथळा काढल्यानंतर शुर संभाजी कावजी यांनी अफजलखानाचे शीर प्रतापगडाच्या बुरुजामध्ये गाडले होते. प्रतापगडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर कधी विमानातून किंवा ड्रोनमधून प्रतापगड बघितला, तर प्रतापगड हा सुंदर फुलपाखरासराखा भासतो.

शिवरयांच्या पराक्रमाची साक्ष सांगणाऱ्या या प्रतापगडाला आवर्जून भेट द्या. त्याचबरोबर वाई, महाबळेश्वर व पाचगणीमध्ये असणारी पर्यटन स्थळे तसेच गडकिल्ले सुद्धा पाहण्यासारखे आहेत. 

सर्वात महत्त्वाची सुचना – गडावर कचरा करू नका

हे सुद्धा आवर्जून वाचा 

Pandavgad Fort; विराटनगरी वाईचा पहारेकरी

इतिहासाच्या पानांवर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याचं नावं सुवर्ण अक्षरांनी लिहीण्यात आले आहे. आजही इतिहासाच्या पाऊलखुणा वाईमध्ये आढळून येतात. वाईला प्रामुख्याने मंदिरे, गडकिल्ले, कृष्णा नदी आणि सह्याद्रीची विस्तीर्ण रांगेने वेढलेले आहे. वाई व खंडाळा तालुक्यांदरम्यान शंभु महादेव डोंगर रांगांमध्ये येरूळी, वेरूळी, मांढरदेव, बालेघर, धामणा आणि हरळी या प्रमुख डोंगरांचा समावेश आहे. याच शंभु महादेवाच्या डोंगर रांगेमध्ये केंजळगड आणि पांडवगड (Pandavgad Fort) हे दोन किल्ले सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहेत. वाईपासून वायव्येस केंजळगड, तर उत्तरेस पांडवगड आहे. विराटनगरी वाईचा पहारेकरी अशी या पांडवगडाची ओळख. याच पांडवगडाचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी हा ब्लॉग, त्यामुळे संपूर्ण ब्लॉग आवर्जून वाचा आणि जास्तीत शेअर करा.

Chandan Vandan Fort; साताऱ्याची जुळी भावंडे

सन 1701 च्या आसपास फतेउल्लाखानाने वर्धनगड, नांदगिरी, चंदन, वंदन हे किल्ले जिंकून घेण्यासाठी हल्ले चढवले. मुघलांनी 6 जून 1701 रोजी वर्धनगड मराठ्यांकडून जिंकून घेतला. मुघलांनी त्याचे नाव सादिकगड ठेवण्यात आले. पुढे काही दिवसांतच नांदगिरीचा किल्ला मुघलांनी जिंकला व त्याचे नाव नामगीर ठेवले. यानंतर किल्ले चंदन आणि नंतर किल्ले वंदन यांना वेढा घातला गेला…

Vairatgad Fort; वाईचा पाठीराखा, सतीशिळा असणारा गड

प्राचीन वैराट ऊर्फ विराटनगरी म्हणजेच वाई शहराचा पाठीराखा आणि म्हणून या गडाचे नाव वैराटगड. शिवकाळातील कवींद्र परमानंद यांनी लिहलेल्या शिवभारत या संस्कृत काव्यग्रंथात वैराटनगरीचा उल्लेख आढळून येतो. या गडाचा इतिहास खूप जूना आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment