Satara News – ‘आई असती तर…’ चिठ्ठीतून उमटली वेदना, तरुणाने घेतला टोकाचा निर्णय; सर्वच हळहळले

आई-वडिलांची सेवा आणि काळजी वेळेत घेतली नाही, तर त्याची जाणीव उशिरा होऊन आयुष्यभर वेदना देऊ शकते, याचं हृदय पिळवटून टाकणारं उदाहरण साताऱ्यात (Satara News) समोर आलं आहे. आई जिवंत असताना तिची योग्य काळजी घेतली नाही, या खंतितून एका २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली.

रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळे गावचा सूरज सुबारे हा लहानपणीच वडिलांना मुकला होता. आईच्या आधारावर त्याचं आयुष्य पुढे सरकत होतं. मात्र, दोन वर्षांपूर्वी आईचं निधन झाल्यानंतर तो पूर्णपणे एकटा पडला. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराच्या शोधात तो साताऱ्यात आला आणि चिमणपुरा पेठेत भाड्याच्या खोलीत राहत होता.

अल्प उत्पन्नात दिवस काढताना त्याच्या मनात आईच्या आठवणी सतत जाग्या राहायच्या. आई हयात असताना तिची सेवा करता आली नाही, याची सल त्याला सतावत होती. या मानसिक ताणातूनच त्याने टोकाचं पाऊल उचललं.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने आपल्या भावना व्यक्त करत, “आई असताना तिची काळजी घेतली असती तर आज ती माझ्यासोबत असती. आता आयुष्याचा कंटाळा आला आहे. माझ्या मृत्यूस मी स्वतः जबाबदार आहे,” असे लिहिले.

ही घटना समाजाला एक महत्त्वाचा संदेश देऊन जाते. आई-वडील असताना त्यांची किंमत ओळखली नाही, तर नंतर केवळ पश्चात्ताप उरतो.

(स्रोत : लोकमत | दत्ता यादव)

error: Content is protected !!