Veer Shiva Kashid history – स्वराज्यासाठी हसत हसत मरण पत्करणारे वीर: शिवा काशीद

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<<

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी, त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावणारी असंख्य माणसं होऊन गेली. मराठा इतिहासातील काही बलिदाने अशी आहेत, की ती केवळ घटना नसून प्रेरणेचे अखंड स्त्रोत ठरतात. त्यांचे बलिदान भारताच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिण्यात आलं आहे. अशाच अद्वितीय शौर्यगाथांपैकी एक म्हणजे हुबेहुब छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे दिसणारे वीर शिवा काशीद (Veer Shiva Kashid history) यांचे बलिदान. स्वराज्यासाठी स्वतःचा जीव अर्पण करणाऱ्या या मावळ्याची कथा अंगावर रोमांच उभे करणारी आहे.

पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूर गावात नाभिक कुटुंबात शिवा काशीद यांचा जन्म झाला. त्या काळात बारा बलुतेदार परंपरेनुसार व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जाई. परंतु शिवा काशीद केवळ आपल्या पारंपरिक व्यवसायापुरते मर्यादित राहिले नाहीत. मेहनतीने मजबूत शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालवणे, गड चढणे-उतरणे आणि युद्धकौशल्य आत्मसात करणे हा त्यांचा दिनक्रम होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात धैर्य, चपळता आणि बुद्धिमत्ता यांचा संगम होता. विशेष म्हणजे ते हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत होते. मजबूत बांधा, सरळ नाक आणि तेजस्वी नजर. त्यांच्याकडे पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराज आल्याचा भास व्हायचा. 

शिवराय पन्हाळगडावर अडकले अन्…

इ.स. १६६० मध्ये स्वराज्यावर दुहेरी संकट कोसळले. एका बाजूला आदिलशाही सरदार सिद्दी जोहरने प्रचंड सैन्यासह पन्हाळगडाला वेढा दिला होता, तर दुसरीकडे मुघल सरदार शाहिस्तेखान पुण्यात तळ ठोकून होता. पन्हाळगडावर अडकलेल्या शिवरायांना वेढा फोडून बाहेर पडणे अत्यंत आवश्यक झाले होते. या संकटसमयी शिवरायांनी एक धाडसी युक्ती आखली, वेढा फोडून विशाळगड गाठायचा. पण शत्रूच्या नजरांना चकवा देणे सोपे नव्हते. याच वेळी जिवाची बाजी लावण्यासाठी शिवा काशीद पुढे सरसावले. त्यांनी महाराजांचा पोशाख परिधान केला. त्यांच्या चेहऱ्याचे साम्य इतके विलक्षण होते की खरे शिवराय कोण आणि शिवा काशीद कोण, हे ओळखणे कठीण झाले. महाराज यासाठी तयार होत नव्हते. मात्र, शिवा काशीद हट्टाला पेटले आणि शत्रूला चकवा देण्यासाठी निघाले. 

मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि किर्रर्र अंधार

१२ जुलै १६६०, आषाढी पौर्णिमेची वादळी रात्र. मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि अंधार. एका पालखीत खरे शिवराय विशाळगडकडे मार्गस्थ झाले, तर दुसऱ्या पालखीत शिवा काशीद शत्रूला भ्रमित करण्यासाठी निघाले. काही अंतरावर शत्रूच्या हेरांनी पालखी ओळखली आणि पाठलाग सुरू झाला. अखेरीस शिवा काशीदांची पालखी शत्रूच्या हाती लागली. शत्रूच्या हाती लागूनही शिवा काशीद घाबरले नाहीत. आपले राजे सुखरूप विशाळगडाकडे मार्गस्थ होत आहेत, याच भावनेने त्यांच्या चेहऱ्यावरच तेज कायम होतं. 

त्यांना सिद्दीसमोर उभे केले गेले. सुरुवातीला शत्रूंना वाटले की त्यांनी शिवाजी महाराजांना पकडले आहे. पण चौकशीत सत्य उघड झालं. सिद्दी फसला होता. ते शिवराय नव्हते, तर त्यांचा विश्वासू मावळा शिवा काशीद होता. त्यांना विचारले गेले, “मरणाची भीती वाटत नाही का?” त्यावर त्यांचे ठाम उत्तर होते, “शिवाजीराजांसाठी हजार वेळा मरायला तयार आहे. शिवाजीराजे तुमच्या हाती कधीच लागणार नाहीत.” या निर्भीड उत्तराने संतप्त झालेल्या सिद्दीने त्यांचे शीर छाटण्याचा आदेश दिला.

त्याग, निष्ठा आणि अदम्य धैऱ्याचे जाज्वल्य प्रतीक 

शिवा काशीदांच्या या बलिदानामुळेच छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचू शकले आणि स्वराज्याचे स्वप्न पुढे नेऊ शकले. त्यांच्या त्यागामुळेच पुढे पावनखिंडीसारख्या लढायांना इतिहासात अमर स्थान मिळाले.

आजही पन्हाळगड परिसरात शिवा काशीद यांची समाधी उभारलेली आहे. त्या ठिकाणी त्यांच्या पराक्रमाचे दर्शन घडवणारी शौर्य स्मारके आणि भव्य म्युरल्स साकारण्यात आली आहेत. एका म्युरलमध्ये शिवराय आणि शिवा काशीद यांची भेट, दुसऱ्यात विशाळगडकडे निघालेल्या पालखीचा प्रसंग, तर तिसऱ्यात त्यांच्या बलिदानाचा क्षण जिवंत केला आहे.

इतिहास कधीच विसरणार नाही की स्वराज्याच्या उभारणीत केवळ राजांचा नव्हे, तर अशा असंख्य मावळ्यांच्या त्यागाचा सिंहाचा वाटा होता. वीर शिवा काशीद हे त्याग, निष्ठा आणि अदम्य धैर्याचे जाज्वल्य प्रतीक आहेत.

error: Content is protected !!