Wai Film Shooting – सावध ऐका पुढल्या हाका! वाईतील चित्रपट चित्रीकरणावर ‘हप्तेखोरी’चे सावट; निर्माते भोरकडे वळले?

स्रोत: लोकमत दैनिक (वृत्त – पांडुरंग भिलारे)

वाई (Wai Film Shooting) तालुका अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीसाठी आकर्षणाचे केंद्र राहिला आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपट जगभरात गाजला त्याचं शुटींगही वाईमध्ये झालं. सलमान खान, अजय देवगण, अमिर खान, नाना पाटेकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांसारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांचं आवडत ठिकाणं म्हणून वाईचा नावलौकिक आहे. कृष्णामाई घाट, मेणवली परिसर, वाईचा पश्चिम भाग, धोम धरण आणि आजूबाजूचा निसर्गरम्य पट्टा यामुळे वाईला ‘निर्मात्यांचे आवडते लोकेशन’ अशी ओळख मिळाली होती. मराठीसह हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण येथे मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. 

मात्र अलीकडच्या काळात वेगळेच चित्र समोर येत असल्याची चर्चा सुरू आहे. चित्रीकरणासाठी येणाऱ्या पथकांकडून काही स्थानिकांकडून बेकायदेशीर पैशांची मागणी केली जात असल्याचे आरोप समोर येत आहेत. आवश्यक परवानग्या आणि अधिकृत शुल्क भरूनही काही जणांकडून दमदाटी होत असल्याची तक्रार निर्मात्यांकडून व्यक्त केली जात आहे. मागणी पूर्ण न झाल्यास चित्रीकरणात अडथळे निर्माण करण्याच्या घटना घडत असल्याचीही माहिती मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर काही निर्मात्यांनी वाईऐवजी भोर तालुक्याकडे चित्रीकरणासाठी वळण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. जर ही परिस्थिती कायम राहिली, तर स्थानिक अर्थचक्रावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. कारण चित्रीकरणामुळे केटरिंग, ट्रान्सपोर्ट, लॉजिंग, हॉटेल व्यवसाय आणि स्थानिक मजूर यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत होता. परंतू अशाच प्रकारे हप्तेखोरी सुरू राहिली तर, भविष्यात वाईची चित्रपटनगरी म्हणून असणारी ओळख पुसायला जास्त वेळ लागणार नाही. आणि याचा थेट परिणाम वाईच्या अर्थचक्रावरही होऊ शकतो. 

वाईने पुन्हा एकदा चित्रपटनिर्मितीचे केंद्र म्हणून आपली ओळख टिकवायची असेल, तर अशा प्रकारांवर ठोस कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे. निर्मात्यांना सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण मिळाले, तरच वाईची ‘फिल्म फ्रेंडली’ प्रतिमा कायम राहू शकेल.

error: Content is protected !!