>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<<
संत वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावर वाई हे ऐतिहासिक शहर सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी “दक्षिणेची काशी” म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. इतिहासाच्या पानावर वाईचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यात आलं आहे. याच वाईमध्ये छोठीमोठी अशी शंभराहून अधिक प्राचीन मंदिरे (Wai Ganpati Mandir) आहेत. या सर्व मंदिरांमध्ये ढोल्या गणपतीचे मंदिर (Dholya Ganpati Temple Wai) सर्वात प्रसिद्ध आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक, भाविक या मंदिराला भेट देत असतात. पेशवे काळात उभं करण्यात आलेलं हे मंदिर मराठ्यांच्या स्थापत्यकलेचे आणि इतिहासाचे जतन करणारे अनमोल रत्न आहे. वाईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराचा नेमका इतिहास काय आहे? हे मंदिर कोणी बांधलं? हे प्रश्न जसे आम्हाला पडले तसे तुम्हालाही पडले असतील. याच प्रश्नांची उत्तरे तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न. त्यामुळे हा लेख आवर्जून वाचाच पण जास्तीत जास्त शेअरही करा.
अन् नानासाहेब पेशवे वाईचे जावई झाले
3 जून 1818 साली बाजीरावांनी धुळकोट येथे शरणगाती पत्करली आणि मराठा साम्राज्याचा अस्त झाला. तत्पूर्वी 1761 ते 1818 या काळात पेशव्यांनी वाईमध्ये अनेक मंदिरांची निर्मिती केली. या मंदिरांमध्ये महागणपती मंदिराचा सुद्धा समावेश आहे. वाईतील मंदिरांचा इतिहास वाचत असताना मिळालेल्या माहितीनुसार, रास्ते घराण्याचे वाईच्या विकासामध्ये मोलाचं योगदान आहे. भिकाजी रास्ते (नाईक) हे साताऱ्यातील एक नामांकित आणि मोठे सावकार होते. आणि त्यांचे जावई नानासाहेब पेशवे (बाळाजी बाजीराव) होते. भट घराण्यातले तिसरे पेशवे म्हणून नानासाहेब पेशवे यांचा उल्लेख केला जातो.
भिकाजी रास्ते यांची कन्या गोपिकाबाई धार्मिक होत्या. त्यांना पुरोहितांच्या धार्मिक बाबींसह पुरोहित ब्राम्हण कुटुंबात पाळल्या जाणाऱ्या प्रथांची चांगल्या प्रकारे माहिती होती. त्यामुळे पहिले पेशवे बाजीराव यांच्या आई राधाबाई गोपिकाबाईंवर चांगल्याच प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पहिल्या बाजीरावांचा ज्येष्ठ पुत्र आणि त्यांचे नातू नानासाहेब पेशवे (बाळाजी बाजारीव) यांच्याशी लग्न करण्यासाठी गोपिकाबाईंची निवड केली. गोपिकाबाई पेशव्यांच्या सुनबाई झाल्या आणि नानासहाबे पेशवे भीकाजी रास्ते यांचे जावई झाले. कौटुंबिक नातं निर्माण झाल्यामुळे रास्ते कुटुंबाचं पेशवे दरबाजी वजन आणखी वाढलं.
पेशव्यांचा पुढाकार आणि वाईचा विकास | Development Of Wai
रास्ते आणि पेशव्यांमध्ये सोयरिक जुळली आणि नानासाहेब पेशवे यांच्याशी गोपिकाबाई यांचा विवाह झाला. या कौटुंबिक नात्यामुळे पेशव्यांनी रास्ते कुटुंबाला 15 लाखांचा संरजाम दिला. रास्ते कुटुंबाचं वजन वाढल्यामुळे पुढील काळात रास्ते हे उत्तर पेशवाईमध्ये साधारण 1761 ते 1818 च्या काळामध्ये वाईत स्थायिक झाले. फक्त स्थायिकच झाले नाही तर, त्यांनी वाईमध्ये आपलं राजकीय वजन निर्माण केलं. वाईचे अनभिषिक्त राजे म्हणून त्यांचा तेव्हा उल्लेख केला जायचा. त्यांनी फक्त सत्ता उपभोगली नाही तर वाईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढाकारही घेतला.

रास्त्यांनी त्यांच्या आश्रितांसोबत कृष्णाकाठावर अनेक घाट बांधले, गोविंद-रामेश्वर, विष्णू, लक्ष्मी, भद्रेश्वर, केदारेश्वर, उमामहेश्वर, महागणपती इ. अशी अनेक सुरेख मंदिरे उभारली. जी आजही सुस्थितीमध्ये उभी आहेत. फक्त मंदिरेच नाही तर शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि बागायतीस उत्तेजन देण्याच्या हेतून किवरा ओढ्यावर छोटी धरणे बांधून पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचं नियोजन केलं. साधारण 1762 च्या दरम्यान वाईचं महागणपती मंदिर रास्ते यांच्या पुढाकारने उभ राहिलं. या मंदिरातील गणेशाची मूर्ती ही अत्यंत विशाल आणि भव्य असून, तिचा आकार पाहता लोकांनी तिला “ढोल्या गणपती” असे संबोधले. “ढोला” म्हणजे गोल व भरदार शरीर असलेला, म्हणूनच या गणपतीला “ढोल्या गणपती” हे नाव पडले.
स्थापत्यकला व मूर्तीचे वैशिष्ट्य
ढोल्या गणपतीची मूर्ती ही कृष्णा नदीच्या काठावर बसवलेली आहे. ती सुमारे १० फूट उंच व ८ फूट रुंद असून, संपूर्ण मूर्ती एकाच दगडातून घडवलेली आहे. मूर्तीचे मुख उजवीकडे असून, हातात मोदक आणि पाश-अंकुश आहेत. मूर्तीच्या समोर नदीचा प्रवाह असल्याने, गणपती बाप्पा जणू सर्व भक्तांवर लक्ष ठेवत आहेत, असे भासते. मंदिराचे बांधकाम काळ्या दगडात केलेले असून, त्याची कारागिरी अत्यंत सूक्ष्म आणि आकर्षक आहे. मंदिराच्या सभोवती सुंदर नंदी मंडप, दीपस्तंभ आणि कोरीव कलाकुसर दिसते. त्यामुळे मंदिरात आणि मंदिराच्या आवाराज प्रसन्न वाटतं आणि थकवा काही क्षणात नाहीसा होतो.
मंदिराचा धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
वाईतील ढोल्या गणपती हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही तर वाई शहराचे प्रतीक आहे, वाईकरांच श्रद्धास्थान आहे, वाईच्या गौरवशाली इतिहासाचं सुवर्ण पानं आहे. दरवर्षी येथे गणेशोत्सव, माघी आणि भाद्रपद चतुर्थी, तसेच इतर अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या सणांना मोठ्या संख्येने वाईकर हजेरी लावतात. गणपती बाप्पाचे हे मंदिर नदीकाठावर असल्यामुळे, वाईतील श्री कृष्णा आरती आणि दीपोत्सवाचे दृश्य अत्यंत मोहक आणि डोळ्यांचं पारणं फेडणार असतं. पावसाळ्यात कृष्णामाई सुद्धा महागणपतीचे दर्शन घेऊन आपला संथ वाहणारा प्रवाह सुरू ठेवते. हे दृश्य सुद्धा पाहण्यासारखं असतं.
मंदिराचा परिसर | Dholya Ganpati Temple Area
ढोल्या गणपती मंदिर वाई शहराच्या कृष्णा घाटावर वसलेले आहे. या परिसरात कृष्णा नदीवर अनेक घाट आहेत, जसे की गंगापुरी घाट, ब्रम्हान घाट, चंद्रभागा घाट, आणि धर्मवीर संभाजी महाराज घाट. घाटांवरील दगडी पायऱ्या, जुनी घरे आणि देवळांची रांग पाहताना जुन्या काळातील पुण्यभूमीचा सुगंध अनुभवास येतो. मंदिराजवळच कशिविश्वेश्वर, श्री महालक्ष्मी, धुलेश्वर आणि श्री राघवेश्वर मंदिरं आहेत. त्यामुळे हे संपूर्ण क्षेत्र धार्मिक पर्यटनासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे वाई फिरण्यासाठी कधी गेलात तर, या सर्व ठिकाणांना आवर्जून भेट द्या.
चित्रपटसृष्टीच आवडतं ठिकाण
वाई हे अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. ढोल्या गणपती मंदिर, मेनवली घाट आणि कृष्णा घाट यांची अप्रतिम पार्श्वभूमी अनेक चित्रपटांत दिसते. स्वामी, गौतमिपुत्र सातकर्णी, सिंहासन, देऊळ बंद, कट्यार काळजात घुसली, छावा, हुप्पा हुय्या, सिंगम, जत्रा, दबंग 2 इ. अनेक चित्रपटांच शुटिंग वाईमध्ये झालं आहे. त्यामुळे वाईकरांना वाईच्या बाहेर राहायलं गेलं तरी चित्रपटांच्या माध्यमातून वाईचं दर्शन आपोआप होतं.
Wai – वाईमधील टॉप 10 पर्यटन स्थळे; नृसिंह मंदिर ते वैराटगड, एकदा अवश्य भेट द्या
ढोल्या गणपतीचे दर्शन व पूजा
दररोज सकाळ-संध्याकाळ मंदिरात आरती आणि पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव काळात मंदिरात विशेष पूजन, आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हजारो भाविक दूरदूरहून या काळात गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येतात.
महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी जायचं कसं? How to get to Wai
महागणपती मंदिर हे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामधील वाई शहरामध्ये आहे. मुंबई ते वाई हे 249 किमी इतकी अंतर आहे तर पुण्याहून वाईला जाण्यासाठी साधारण 90 किमी अंतर आहे. मुंबईहून वाईला जाण्यासाठी अनेक खासगी तसेच एसटी महमंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत. पांचगणी महाबळेश्वरला जाणाऱ्या सर्वच गाड्या या वाईहून पुढे जातात. त्यामुळे वाईला जाण्यासाठी गाड्यांची उपलब्धता चांगल्या प्रकारची आहे. वाई एसटी स्टँडला उतरल्यावर चालत अगदीच 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर ढोल्या गणपतीचे मंदिर आहे.
(सोर्स – मराठी विश्वकोश आणि Wikipedia)