बलकवडीचे सुपुत्र अशोक लक्ष्मण जाधव : एका संयमी, मनमिळावू आणि लोकाभिमुख नेतृत्वाची मनाला चटका लावणारी एक्झिट

वाई तालुक्यातील बलकवडी गावचे सुपुत्र आणि आपल्या संयमी, मनमिळावू स्वभावाने समाजमनावर अधिराज्य गाजवणारे अशोक लक्ष्मण जाधव यांचे ११ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरू होते. त्यांना योग्य उपचार मिळावेत म्हणून सर्वांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने केवळ जाधव कुटुंबाचाच आधारवड कोसळला नाही, तर संपूर्ण वाई तालुका आणि सामाजिक वर्तुळात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

‘दादा’ – नावातच दडलेली मायेची सावली

अशोक जाधव हे त्यांच्या नावाप्रमाणेच खऱ्या अर्थाने परिसरातील प्रत्येकाचे ‘दादा’ होते. चेहऱ्यावर सदैव हसू, मनात आपुलकी आणि समोरच्याला क्षणात आपलंसं करण्याची अप्रतिम कला त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. सामाजिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसर राहणाऱ्या दादांनी कधी कोणाशी रागाने शब्दही उच्चारला नाही. कितीही गंभीर, जटील किंवा बिकट परिस्थिती निर्माण झाली, तरी अत्यंत शांततेने आणि संयमाने त्यावर योग्य मार्ग काढणे ही त्यांची सर्वात मोठी खासियत होती. संकटसमयी पाठीशी ठामपणे उभा राहणारा आधारवड म्हणून त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले होते.

स्थानिक प्रश्न, शिक्षण आणि तरुणांना सतत पाठबळ

गावच्या विकासापासून ते सामाजिक सलोखा जपण्यापर्यंत दादांचा पुढाकार नेहमीच उल्लेखनीय राहिला. बलकवडी परिसरातील क्रीडा, शैक्षणिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना ते सदैव भरभरून प्रोत्साहन देत असत. गावातील तरुणांना योग्य मार्गदर्शन करणे आणि गरजूंना वैद्यकीय अथवा आर्थिक मदतीचा हात देणे, याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले.

समाजाची आणि कुटुंबाची अपार हानी

आज कोणाचा मार्गदर्शक ‘दादा’ निघून गेला, तर कोणी आपला हक्काचा ‘काका’ आणि ‘मामा’ गमावला. एका पत्नीने आपल्या आयुष्याचा भक्कम आधार गमावला, तर मुलाच्या डोक्यावरील बापाचे छत्र हरपले. समाजासाठी सदैव तत्पर राहणारा एक दमदार, निष्ठावंत आणि दिलदार माणूस आज आपल्यातून निघून गेला आहे.

सर्वस्तरातून भावूक श्रद्धांजली

दादांच्या निधनाची वार्ता समजताच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या हजारो व्यक्तींनी अत्यंत जड अंतःकरणाने त्यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या कामातून आणि निर्मळ स्वभावातून त्यांनी जोडलेली माणसेच आज त्यांच्या आठवणीने व्याकुळ झाली आहेत.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment

error: Content is protected !!