Wai News – आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर वाई पोलिसांचे शक्तीप्रदर्शन; ‘दंगा काबू’ तालीम आणि शहरातून रुट मार्च

आगामी ईद-ए-मिलाद आणि रक्षाबंधन या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाई (Wai News) पोलिसांच्या वतीने सोमवारी (२४ ऑगस्ट) ‘दंगा काबू’ योजनेची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) आणि भव्य रुट मार्च आयोजित करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १०:३० ते १२:२० या वेळेत ही कारवाई करण्यात आली. सण-उत्सवाच्या काळात शहरात कोणताही जातीय तणाव निर्माण होऊ नये आणि शांतता टिकून राहावी, यासाठी पोलिसांनी ही तयारी दर्शवली आहे.

या तालीम आणि रुट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक काळे यांच्यासह वाई व पाचगणी पोलीस ठाण्याचा कर्मचारी वर्ग, आरसीपी (RCP) अंमलदार, होमगार्ड आणि ३ शासकीय वाहने सहभागी झाली होती. जातीय दंगलीसारखी अनुचित घटना घडल्यास त्यावर तात्काळ नियंत्रण कसे मिळवायचे, याचे प्रात्यक्षिक या रंगीत तालीमीदरम्यान घेण्यात आले. तालीम यशस्वीपणे पार पडल्यानंतर पोलिसांच्या पथकाने शहरभरातून शिस्तबद्ध रुट मार्च काढला.

हा रुट मार्च शहरांमधील प्रमुख व संवेदनशील भागांतून काढण्यात आला. किसनवीर चौक, पी.आर.चौक, जामा मशीद, चावडी चौक, दातार हॉस्पिटल, ब्राह्मण शाही चौक आणि मोठा पूल मार्गे पोलीस स्टेशन वाई येथे या मार्चची सांगता झाली. रुट मार्चनंतर उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आगामी सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या मार्गदर्शक सूचना व आदेश दिले.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!