पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या दोघांचा मृत्यू, 12 जखमी

मुंबई-बंगळूर महामार्गावरील जांभूळवाडी येथील दरी पुलावर शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. सातारा बाजूकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकचालकाचे (प्रमोद विठ्ठल वाघ) वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोर चाललेल्या आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेनंतर दोन्ही ट्रक दुभाजक तोडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर आले आणि समोरून येणाऱ्या एर्टिगा व टाटा अल्ट्रोझ या दोन मोटारींना त्यांनी उडवले. गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या भाविकांच्या वाहनांचा या अपघातात समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत असून, अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ‘सकाळ’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

या दुर्दैवी दुर्घटनेत टाटा अल्ट्रोझ कारमधून प्रवास करणाऱ्या वाई तालुक्यातील (वयगाव) आनंदीबाई रामचंद्र वाडकर (वय 50) आणि जोगेश्वरी (पूर्व, मुंबई) येथील हृदयनाथ मोहन गायकवाड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गणेशोत्सवाच्या आनंदावर या भीषण अपघातामुळे दुःखाचे सावट पसरले आहे. अपघाताची माहिती मिळताच आंबेगाव पोलीस, भारती विद्यापीठ वाहतूक विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आली असली, तरी या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

 

Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!