Kalyangad Fort – दत्तांच्या पादुकांपर्यंत पोहचण्याचा एक थरारक अनुभव, साताऱ्याचा कल्याणगड

सातारा जिल्ह्यातील काही गडांची माहिती आपण मागील काही ब्लॉगमध्ये पाहीली आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला सातारा जिल्हा आपल्या वैविध्यपूर्ण इतिहासासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. शिलाहार घराण्याने बराच काळ कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. शिलाहार घराण्यातील राजा दुसरा भोज याने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अनेक गडांची निर्मिती केली होती. या गडांमध्ये अजिंक्यतारा, भुदरगड, दातेगड सारख्या काही गडांचा समावेश आहे. याच फळीतला एक गड म्हणजे Kalyangad Fort होय.

कल्याणगड नांदगिरी या नावाने सुद्धा ओळखला जातो. साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावार असणारा हा गड गडावर असलेल्या लांबलचक गुहेसाठी प्रसिद्ध आहे. गुहेमध्ये दत्तांच्या पादुका असून तिथपर्यंत जाण्याचा थरार अनुभवण्यासाठी कल्याण गडाला एकदा आवर्जून भेट दिली पाहिजे. वेळ न दवडता गडाची संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. त्यामुळे ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.

कल्याणगड आणि इतिहास

शिलाहारा राजा दुसरा भोज आणि सातारा जिल्हा यांचा इतिहास फार जुणा आहे. सातारा जिल्ह्यात असणाऱ्या अनेक गडांच्या निर्मीतीचे श्रेय शिलाहार राजा दुसरा भोज याला दिले जाते. इ.स 1178 ते इ.स 1209 कालावधीत शिलाहार राजा दुसरा भोज यानेच कल्याणगड बांधल्याची नोंद सातारा येथे सापडलेल्या ताम्रलेखामध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर बहामणी आणि मुघल यांच्या ताब्यात गड गेला असावा. इ.स 1209 ते 1673 या काळात महाराष्ट्रात आलेल्या घराण्यांनी गडावर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र, त्याची इतिहासात नोंद आढळून येत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा विडा उचलला होता. त्यासाठी त्यांनी एकएक करत अनेक गडांना स्वराज्यात सामील करून घेत गडांवर भगवा ध्वज फडकवला होता. इ.स 1673 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा व सातारा जिल्ह्याच्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक प्रदेश जिंकून घेतले. अनेक गडांवर भगवा ध्वज फडकवला. याच वर्षी त्यांनी कल्याणगड सुद्धा जिंकून घेतल्याची इतिहासात नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर गडाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी प्रतिनिधींच्या ताब्यात देण्यात आली होता.

कमळगड किल्ला/Kamalgad fort Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानतंर कल्याणगडावर नेमून देण्यात आलेले प्रतिनिधी आणि पेशव्यांमध्ये मोठा वाद झाला होता. या वादामुळे कल्याणगडाचा ताबा पेशव्यांकडे गेला होता. इ.स. 1818 पर्यंत कल्याणगड पेशव्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर इंग्रज अधिकारी जनरल प्रिझलरने कल्याणगड जिंकून घेतला.

गडावर पाहण्यासारखे काय आहे

कल्याणगडाचा गडमाथा फार मोठा नाही. त्यामुळे आरामात जरी गड पाहिला तर साधारण अर्धा ते एक तासात संपूर्ण गड पाहून पूर्ण होतो. गडावर चढताना तुम्हाला पाण्याची दोन खांबी टाकी लागतील. कल्याणगडाला प्रामुख्याने दोन दरवाजे आहेत. एक दरवाजा उत्तराभिमुख आहे आणि दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख आहे. उत्तराभिमुख दरवाजातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मंदिराचे दर्शन होते. मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या बाजूने तुम्हाला एक तटबंदी गडाच्या सर्वात आकर्षक ठिकाणी घेऊन जाईल. इथे एक भुयार असून या भुयाराची लांबी 30 मीटर, 4 मीटर रुंद व 3 मीटर अशा स्वरुपाची आहे. या भुयाराचे वैशिष्ट्य म्हणजे या भुयारात वर्षांचे बारा महिने पाणी असते.

रायरेश्वर किल्ला / Raireshwar Fort Information In Marathi

भुयारामध्ये तुम्हाला तीन देवांचे दर्शन होईल. भुयारात पद्मावती देवी, पार्श्वनाथ आणि श्री दत्तात्रेयाची मुर्ती आहे. पावसाळी वातावरणात भुयारात जाणे धोक्याचे ठरू शकते. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून भुयारात जाताना बॅटरी सोबत घेऊन जाणे. भुयार बघून झाल्यानंतर गडावर हनुमान मंदिर, बामणघर, कल्याणस्वामींची समाधी आणि गणपती बाप्पाचे मंदिर सुद्धा आहे. त्याच बरोबर गडावर एक मोठे तळे लक्ष वेधून घेते. काही प्रमाणात गडावर वाड्याचे अवशेष आणि एक पीराचे थडगे आहे. याव्यतिरिक्त गडावर तलवारीच्या आकारात कोरलेला एक दगड सुद्धा आहे. या कलाकृती पाहून झाल्यानंतर गडाच्या पूर्व टोकापाशी यावे. गडाच्या पूर्व टोकावरून चौफेर नजर फिरवल्यानंतर तुम्हाला अजिंक्यतारा, जरंडा, यवतेश्वर, चंदनवंदन, मोऱ्या, वैराटगड या गडांचे दर्शन होते.

गडावर जायचे कसे

कल्याणगडावर जाण्याची एकच वाट आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदगिरी म्हणजेच धुमाळवाडी या गावातून गडावर जाण्याची वाट गेली आहे. सातारा एसटी स्थानकावरून सातरा रोडला जाणाऱ्या अनेक गाड्या आहेत. त्यातील एक गाडी पकडून सातारा रोडला उतरावे आणि तिथून नांदगिरी हे साधारण तीन किलोमीटरचे अंतर आहे नांदगिरी गावातून गडावर जाण्यासाठी चांगल्या स्थितीत पायवाट आहे. या वाटेने गडावर जाण्यासा साधारण एक तास किंवा त्याहून कमी वेळ लागू शकतो. तुमच्या चालण्याच्या स्पीडवर गडावर पोहचण्याचा वेळ अवलंबून आहे. तसेच गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत चांगला रस्ता आहे. त्यामुळे वैयक्तिक वाहन असेल तर गाडी घेऊन प्रवेशद्वारापर्यंत जाता येऊ शकते.

गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का

गडावर काही मंदिरे आहेत. त्यामुळे त्या मंदिरांमध्ये राहण्याची सोय होऊ शकते. गडावर पाण्याची एक दोन टाकी आहेत. मात्र, पाणी पिण्यायोग्य आहे का नाही या बाबात खात्री नाही. त्यामुळे शक्यतो गडावर जाताना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी घेऊन जावे. त्याच बरोबर गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे आपली सोय आपणच करावी.

गडावर जाण्यापूर्वी या महत्त्वाच्या सुचना तुम्हाला माहित असणं गरेजेच आहे

गडावर असणाऱ्या भुयारात पावसाळ्यात जाता येत नाही. इतर ऋतुंमध्ये या गुहेत साधारण गुढगाभर पाणी आणि भयंकर अंधार असतो. त्यामुळे आतमध्ये जाताना बॅटरी घेऊन जाणे क्रमप्राप्त आहे. तसेच भुयाराच्या आजूबाजूला मधमाश्यांची पोळी आहेत. त्यामुळे जास्त काळजी घ्यावी. तसेच संध्याकाळी 5 च्या आत गडावरून खाली उतरावे कारण गड 5 नंतर बंद केला जातो.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment