>> गणेश सुरेखा मारूती वाडकर
धडधड धडधड… जेव्हा गड चढायला सुरुवात केली तेव्हा आमच्या हृदयाची अवस्था अशीच झाली होती. मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. गड चढायला अवघड होता. एक चूक आणि थेट गडावरून खाली, अशा प्रकारची गडावरील कातळात कोरलेल्या पायऱ्यांची रचना होती. परंतू मनातून पूर्ण निश्चय केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद पाठीशी होता आणि भैरवनाथाच्या परिसरात असल्यामुळे गडावर सुखरूप चढाई केली आणि पहिल्यांदा रॅपलिंगचा अनुभव घेत गड उतरलो सुद्धा.
चला मोरोशीचा भैरवगडाची सफर करूया…
प्रत्येक महिन्यात एक दुर्ग करायचा असा निश्चय मनाशी पक्का केला आहे. चंदेरी, गोरखगड सारखे कठीण दुर्ग यापूर्वी केले आहेत. परंतू हे दुर्ग करत असताना कुठेही रॅपलिंगची गरज भासली नाही. शिस्तीत गडावर गेलो आणि त्याच शिस्तीत पुन्हा गडाखाली आलो. परंतू मोरोशीच्या भैरवगडाचा विषय या दोन गडांपेक्षा वेगळा होता. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात मोरोशीचा भैरवगड सर करण्याचं मनाशी पक्क केलं. आतापर्यंत 30 गड पाहिले होते, परंतू कोणत्याही गडावर जताना आम्ही कोणत्याही ग्रुपसोबत गेलो नव्हतो. पंरतू मोरोशीच्या भैरवगडावर जाताना असं करून चालणार नव्हतं. अनुभवी आणि विश्वासपात्र संघटनेच्या सोबतीने गडावर जावं लागणारं होतं. शोधाशोध सुरू झाली आणि सह्याद्री संजीवनी ग्रुपसोबत मोरोशीचा भैरवगड सर करण्यावर शिक्कामोर्तब झाला. 9 नोव्हेंबर 2025 ही तारीख ठरली आणि शनिवारी (8 नोव्हेंबर 2025) रात्री आम्ही ठाण्याहून गाडी पकडून गडाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू केला.
मोरोशीच्या भैरवगडाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर पुढील लिंकवर क्लिक करा – मोरोशीचा भैरवगड
आदळत आपटत प्रवास आणि गडाच्या पायथ्याला पोहोचलो
ठाण्याहून गाडी पकडल्यामुळे आम्हा पाच जणांना थेट ट्रॅव्हल्सच्या शेवटच्या सीटवर बसण्याची दुर्दैवी संधी मिळाली. हसत हसत आम्ही सीटवर बसलो, पण रात्रभर झोप काही लागली नाही. रस्त्यांची दुर्दशा आणि सुरू असलेल्या विकास कामांमुळे संपूर्ण प्रवास आदळत आपटतच झाला. प्रचंड धक्के खात साधारण पहाटे तीन चे चारच्या दरम्यान गडाच्या पायथ्याला आम्ही पोहोचलो. गरमा गरम पोह्यांवर ताव मारून गड चढण्याचा आमचा मनसुबा होता. परंतू जास्त थंडी असल्यामुळे पोहे सुद्धा अगदी थंडच मिळाले. चहा तेवढा गरम होता. त्यामुळे गरम चहावरच समाधान मानलं आणि मन घट्ट करून गड चढण्यास सुरुवात केली.
गढ चढण्यास सुरुवात
गड चढण्यापूर्वी गडाची प्राथमिक माहिती आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हेलमेट आणि हार्नेस सर्वांना देण्यात आलं. जवळपास 30 ते 40 जणांचा आमचा ग्रुप होता. सर्वांनी दिलेल्या सूचना ऐकल्या आणि बॅटरीच्या उजेडात गड चढण्यास सुरुवात केली. एकमेकांना धीर देत गड चढला आणि 6 च्या दरम्यान आम्ही मोरोशीचा भैरवगड ज्या ठिकाणाहून अगदी रुबाबात दिसतो, त्या ठिकाणी पोहोचलो. या ठिकाणी सर्वांना रॅपलिंगची माहिती देण्यात आली आणि फोटो वगैरे काढून भैरवगडाला वळसा मारून भैरवगडाच्या कातळात कोरलेल्या आणि उद्ध्वस्त केलेल्या खड्या पायऱ्यांपाशी आम्ही पोहोचलो. इन्स्टाग्रामच्या रिलमध्ये या गडाचं रौद्ररूप आम्ही पाहिलं होतं. परंतू आता वेळ आली होती प्रत्यक्षात या गडावर चढण्याची. विशेष म्हणजे रॅपलिंग करण्याचा कोणताही अनुभव पाठीशी नव्हता.
मोरोशीच्या भैरवगडाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर पुढील लिंकवर क्लिक करा – मोरोशीचा भैरवगड
रॅपलिंगचा थरारक अनुभव
हार्नेसच्या मदतीने एकमेकांना मोटीव्हेट करत आम्ही भैरवगडाच्या अवघड चढाईला सुरुवात केली. थोडं चढून वर गेल्यानंतर एक अवघड पॅच आला जिथे सर्वांचीच हवा टाईट झाली होती. मात्र, याच पॅचवर एक दादा बिंदास एका मजबूत दोरीच्या मदतीने गडाला लटकले होते. गडावर चढणाऱ्यांना तेच एक एक करत त्या अवघड पॅचवरून सर्वांना वरती पाठवण्यास मदत करत होते. तो अवघड पॅचही आम्ही त्या दादांच्या मदतीने सर केला. त्यानंतर गडावर पोहोचलो आणि गड पाहिला. गडावर पाहण्यासारखं असं काही नाही. पंरतू गडावरून रतनगड, हरिश्चंद्रगड असे अनेक गड आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा पाहता येतात. गडावर काहीवेळ विश्रांती केल्यानंतर गड उतरण्यास सुरुवात झाली. गड अगदी काही मिनिटांत उतरू असा आमचा गोड गैरसमज झाला. कारण रॅपलिंग करण्यासाठी बरीच मोठी लाईन लागली होती. त्यात गडावर येणाऱ्यांची संख्या वाढत होती. त्यामुळे भर उन्हात सूर्यदेवाचे चटके सहन करत आम्ही रॅपलिंग करण्यासाठी लाईनीमध्ये उभे होतो. रॅपलिंग करण्यासाठी नंबर आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेत रॅपलिंगचा यशस्वी थरार आम्ही अनुभवला.
महाराष्ट्रातील सर्वात अवघड दुर्ग आम्ही सर केला आणि हा अनुभव आमच्या गड किल्ले प्रवासाच्या पुस्तकात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला. सह्याद्री संजीवनी टीमच्या मदतीने आमचा हा थरारक ट्रेक यशस्वी झाला.
मोरोशीच्या भैरवगडाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर पुढील लिंकवर क्लिक करा – मोरोशीचा भैरवगड



