रायगड जिल्ह्याचा ज्या प्रमाणे ऐतिहासिक नाव लौकिक आहे. त्याच प्रमाणे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचं नाव सुद्धा सुवर्ण अक्षरांनी इतिहासामध्ये नोंदवलेले आहे. त्यामुळेच मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांची पावले कर्जतच्या दिशेने आपसूक वळतात. ट्रेकर्सची पंढरी म्हणून कर्जतचे नाव सध्या तरुणांमध्ये प्रचलित आहे. त्यामुळेच या कर्जत तालुक्यात दडलेल्या ऐतिहासिक कोंडाणे लेण्यांची (Kondane Caves) सफर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. या कोंडाणे लेण्यांचा सविस्तर इतिहास आणि प्रवासाची माहिती तुम्हाला सुद्धा व्हावी म्हणून हा प्रपंच. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत आवर्जून वाचा.
नवी मुंबईतून प्रवासाला सुरुवात झाली. ठाणेमधून 7:28 ची कर्जत फास्ट पकडून कोंडाणे लेण्यांच्या दिशेने आम्ही मार्गस्थ झालो. कर्जतवरून कोंडाणा गावात जाण्यासाठी एसटी बसची सुविधा नाही. त्यामुळे रिक्षा किंवा टॅक्सी हे दोनच पर्यात कर्जत स्टेशवरून कोंडाणेला जाण्यासाठी उपलब्ध आहे. कर्जत ते कोंडाणा गाव अंदाजे 300 ते 600 रुपये घेतले जातात. तसेच पुन्हा कर्जत स्टेशनला येण्यासाठी तेवढाच खर्च करावा लागतो. त्यामुळे शक्यतो स्वत:ची गाडी घेऊन जाण्याला प्राधान्य द्यावे. कर्जत ते कोंडाणे गावा दरम्यान उल्हास नदीचे विस्तीर्ण पात्र आपले लक्ष वेधून घेते. सह्याद्री, उल्हास नदी आणि नदीच्या किनार्याने रस्ता कोंडाणे लेण्यांच्या दिशेने गेला आहे. त्यामुळे या प्रवासात निसर्गाचं सुंदर रुप डोळ्यात साठवून लेण्यांच्या दिशेने मार्गस्थ व्हावे.
कोंडाणा गाव ते लेणी अंदाजे अर्ध्या तासाचा जंगल ट्रेक आहे. या अर्ध्या तासाच्या ट्रेकमध्ये दोन ते तीन धबधबे थकवा कमी करण्याचे काम करतात. ट्रेक छोटा असला तरी सह्याद्रीच्या कुशीत वावरण्याचे भाग्य लाभणं म्हणजे मोठी गोष्ट. एक ते दीड तासात लेणी पाहून होतात. जायचं कसं ते समजलं पण कोंडाणे लेण्यांचा नेमका इतिहास काय आहे? हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. तुमच्या या प्रश्नाचे उत्तर पुढे दडलेले आहे.
Kondane Caves इतिहास आणि बरंच काही
महाराष्ट्रामध्ये अनेक प्रसिद्ध प्राचीन लेणी आहेत. या लेण्यांपैकी एक म्हणजे कर्जत तालुक्यातील कोंडाणे लेणी. पैठण आणि जुन्नर या व्यापारी मार्गावर आणि कर्जत पासून 13 किमी. अंतरावर कोंडाणे लेणी आहेत. जाणकारांच्या मते कोंडाणे लेणी ही भाजे लेण्यांच्या समकालीन आहेत. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात लेणी खोदण्यात आल्याचे सांगीतले जाते. या लेण्यांची पहिली नोंद सन 1830 मध्ये विष्णू शास्त्री यांनी केली होती. त्यांच्यानंतर 1830 च्या काळात ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी लॉ साहेब यांनी या लेण्यांना भेट दिल्याची नोंद आहे. या लेणी समूहात प्रामुख्याने 16 बौद्ध लेणी आहेत.
पश्चिमाभिमुख लेणीसमुहात एक चैत्यगृह, सात विहार, एक पाण्याचे कुंड आणि तीन शिलालेख आपल्याला पहायला मिळतात. मात्र सध्या फक्त दोनच शिलालेख चांगल्या अवस्थेमध्ये आहेत. लेणीतील चैत्यगृहात असणारी कमान ही पिंपळाकृती आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला शिल्पपट आहे. ही लेणी हीनायनपंथातील असल्याची सुद्धा इतिहासात नोंद आहे.
मुख्य चैत्यगृह (लेणी क्रमांक 1)
घनदाट झाडी आणि धबधब्यांमध्ये मनसोक्त आनंद घेतल्यानंतर लेण्यांच्या पायऱ्यांपशी येऊन आपला प्रवास थांबतो. इथून पुढे पायऱ्या चढून वर गेल्यानंतर लेण्या सुरू होता. सर्वात पहिलं दर्शन होत ते म्हणजे लेणी क्रमांक 1 म्हणजे मुख्य चैत्यगृहाचे. हे चैत्यगृह भव्य, रेखीव आणि प्रमाणबद्ध आहे. या चैत्यगृहाकडे नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, या चैत्यगृहाची रचना दोन मार्गिका आणि दालण अशी आहे. तसेच याचे विधान चपाकर असून छथ गजपृष्ठाकार आहे. चैत्यकृह 22 मी. लांब, 9 मी.रुंद व 8.5 मी. उंच आहे. चैत्यगृहात असलेल्या स्तुपाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. चैत्यगृहात असणाऱ्या दोन लाकडी कमानी साधारण 2000 वर्ष जुन्या असण्याची शक्यता आहे.
चैत्यगृहाच्या दर्शनी भागात गवाक्षे व वेदिकापट्टी यांचे कोरीवकाम कलेले आढळून येते. चैत्यकमानीच्या दोन्ही बाजूंस सात शिल्पपट कोरलेले आहेत. या शिल्पपटांमध्ये युगुलांची नृत्य करणारी शिल्पे कोरलेली आहेत. यामध्ये असणारे पुरुषनर्तक योद्धे असण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या हातामध्ये मुसळसदृश शस्त्र, धनुष्यबाण आणि ढाल अशी हत्यारे पहायला मिळतात.
चैत्यगृहामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच दर्शनी भागातील डावीकडच्या भिंतीवर भग्नावस्थेतील द्वारपालाचे शिल्प कोरलेले आहे. या द्वारपालाचा फक्त चेहराच आपल्याला पाहता येतो.
लेणे क्रमांक 2
मुख्य चैत्यगृहानंतर असणारे दुसरे महत्वाचे लेणे म्हणजे लेणे क्रमांक 2. हा एक विहार असून चैत्यकमानीच्या पातळीवर कोरलेला आहे. व्हरांडा, सभागृह आणि या विहारामध्ये असणार्या तिन्ही भिंतीमध्ये खोल्या अशी या विहाराची रचना आहे. सभागृहात 15 खांब होते. पण सध्या फक्त स्तंभशीर्ष सुरक्षित राहिले आहेत. सभागृहामध्ये एकूण 18 खोल्या आहेत. खोल्यांची प्रवेशद्वारे अरूंद आणि द्वारशाखाविरहीत (दरवाजे नसलेली) आहेत. खोल्यांची रचना व्यवस्थित पाहीली तर तुमच्या निदर्शणास येईल की, उजव्या व डाव्या बाजुच्या पहिल्या दोन खोल्यांमध्ये दोन दगडी बाक आहेत. या दोन खोल्यांव्यतिरिक्त इतर सर्व खोल्यांमध्ये एकच बाक आहे.
दीर्घिकेच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर चार अर्धस्तंभ आणि त्याच्यावर वेदिकापट्टी कोरलेली आहे. या वेदिकापट्टीच्यावर अर्धउठावातील प्रमाणबद्ध स्तूप कोरलेला आहे. स्तुपाच्या भोवती पिंपळपानावर चैत्यकमान कोरलेली आहे. तसेच स्तुपाच्या वर हर्निका आणि यष्टी कोरलेली आहे. या स्तुपाची रचना मुख्य चैत्यगृहात असलेल्या स्तुपासारखी आहे.
लेणी क्रमांक 3
मुख्य विहारात लागून असलेल्या उपलेण्याला लागून लेणी क्रमांक तीन आहे. या लेण्यांमध्ये असलेल्या सभागृहाच्या भोवती तिन्ही बाजूंना आठ खोल्या आहेत. तसेच दर्शनी भागात दोन खिडक्या सुद्धा पहायला मिळतात. या लेण्यावर कोणतेही नक्षीकाम करण्यात आलेले नाही. तसेच या लेण्याची बरीच पडझड सुद्धा झालेली आहे.
लेणी क्रमांक 4 हे लेणे क्रमांक तीनला लागून आहे. या लेण्यांमध्ये दोन खोल्या असून त्यात प्रत्येकी दोन ओटे आहेत. त्याचबरोबर लेणी क्रमांक 5 आणि 6 यांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.
लेणे क्रमांक 8
हे लेणे डाव्या बाजूच्या कोपऱ्यात पहायला मिळते. या लेण्यांक़डे नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, या लेण्याच्या सभागृहात डाव्या आणि उजव्या भिंतीला लागून कमी उंचीचा बाक आहे. तसेच पाठीमागील भिंतीमध्ये एक खोली आहे. या खोलीमध्ये डाव्या बाजूला दगडी बाक आहे. या खोलीच्या अंतर्भागात आणखी एक खोली आहे. एकंदरीत या लेण्याची रचना पाहता या लेण्यातील सभागृहाचा उपयोग भोजनमंडप म्हणून, तर छोट्या खोलीचा उपयोग धान्य ठेवण्यासाठी होत असावा. याच लेण्याच्या जवळ लेणीसमुहातील एकमेव विस्तीर्ण पाण्याचे कुंड आहे.
बोरघाटातून होणारी व्यापाऱ्यांची वाहतूक काही काळानंतर मोठ्या प्रमाणात कमी झाली. त्यामुळे या व्यापाऱ्यांकडून या लेण्यांना मिळणार आश्रय कमी होत गेला. याच मुख्य कारणामुळे लेण्यांचे महत्व कमी झाले. त्यामुळे बऱ्याच लोकांना या लेण्यांबद्दल माहिती नाही.
हे सुद्धा आवर्जून वाचा
1) Irshalgad Fort; भूस्खलनामुळे प्रकाशझोतात आलेला गड, दुर्घटनेची वर्षपूर्ती
2) Sondai Fort; मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड
3) Sudhagad Fort; या गडाचा विचार शिवरायांनी राजधानीसाठी केला होता
छान माहिती:अभ्यासपूर्ण लेख