सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचा अभिमान म्हणजे Mahimangad होय. सातारा-पंढरपूर रस्त्यावर अगदी थाटात उभा असणारा महिमानगड ताशीव कातळ कड्यांमुळे आपलं लक्ष वेधून घेतो. माण तालुका आणि परिसरातील अनेक दुर्ग मुख्य डोंगर रांगेपासून वेगळे झाले असून वेगवेगळ्या डोंगरावर विराजमान झाले आहेत. महिमानगडाच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासारखी आहेत. माण तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, तालुक्यात असणाऱ्या गडांचा इतिहास फार जुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्यामुळे माण तालुक्यात असणाऱ्या गडांचा इतिहासही तितकाच तेजस्वी आणि मराठ्यांच्या शौऱ्याची गाथा सांगणारा आहे.
Mahimangad आणि इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महिमानगड स्वराज्यात होणाऱ्या व्यापाऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. आदिलशहाच्या काळात विजापूर हे राजधानीचे ठिकाण होते. राजधानीच्या ठिकाणी येणारा आणि राजधानीतून जाणारा व्यापारी मार्ग सुरक्षीत ठेवणे महत्त्वाचे होते. व्यापारी मार्ग सुरक्षित असावा या दृष्टीने आदिलशहाने काही गडांची त्याच्या काळात निर्मिती केली होती. विजापूर पासून कोकणातल्या बंदरांपर्यंत जाणारा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग म्हणजे विजापूर-पंढरपूर-सातार-वाई-महाड. विजापूर ते कोकणा असा टप्पा या मार्गामध्ये समाविष्ट होता. विजापूरहून निघणारा माल कोकणात सुरक्षित पोहचवण्यासाठी व्यापारी मार्ग सुरक्षित करून घेणे गरजेचे होते. त्यामुळे आदिलशहाने हा व्यापारी मार्ग सुरक्षित करण्यासाटी महिमानगड बांधून घेतला.
आदिलशहाने गड बांधल्यानंतर बराच काळ गडावर आदिलशहाचा ताबा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार करताना सातारा प्रांतातील अनेक गड आपल्या ताब्यात घेतले होते. त्याच अनुषंगाने साताऱ्याच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरिता शिवरायांनी अनेक गड जिंकून घेतले. या गडांमध्ये महिमानगडाचा सुद्धा समावेश होता. त्या काळात गडाचे रक्षण करण्यासाठी महार रामोशी यांच्यासह एकूण 75 इसमांची गडावर मोर्चेबांधणी करण्यात आली होती.
गडाची सध्याची अवस्था कशी आहे
महिमानगड गिरीदुर्ग प्रकारात मोडत असला तरी गडाची चढाई सोपी आहे. गडाची समुद्रसपाटीपासून उंची 3200 फुट इतकी आहे. गडाची काही ठिकाणी थोडीफार पडझड झाली असली तर गड व्यवस्थित आहे. त्यामुळे गडाला एकदा आवर्जून भेट द्या.
गडावर पाहण्यासारखे काय आहे
महिमानगडावर जाताना गडाच्या दरवाजाचे बुरूज आपलं लक्ष वेधून घेतात. गडाच्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश होतो. गडावर चढत असताना डावीकडे तटबंदीच्या खाली कपारीमध्ये पाण्याची टाकी कोरलेली पहायला मिळतात. गडावर प्रवेश करताना लागलेल्या प्रवेशद्वाराच्या चौकटीत हत्तीचे सुंदर शिल्प कोरण्यात आलेले आहे. कलेचा उत्तम नमुना आपल्याला प्रवेशद्वारापाशी पहायला मिळतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला असणारी तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची रचना गोमुखी स्वरुपाची आहे. गडावर प्रवेश केल्यानंतर दोन वाटा फुटतात डावीकडील वाट तुम्हाला गडाच्या माथ्यावर घेऊन जाईल आणि समोर जाणारी वाट तुम्हाला तटबंदीच्या दिशेने घेऊन जाईल. प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर ऊजव्या बाजूला नजर फिरवल्यात समोरच हनुमानाचे छोटे मंदिर तुमचे लक्ष वेधून घेईल. मारुती रायाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर गड फिरण्यास सुरुवात करावी.
kenjalgad fort – वाईचा केंजळगड, छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे नामकरण केले होते
मंदिरा समोरच बुरूजावर जाण्यासाठी पायर्या आहे. या ठिकाणी आल्यांतर एकाच टप्प्यात संपूर्ण गडाची तटबंदी नजरेस पडते. दुर्दैवाने गडाची तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली आहे. तटबंदीवर आपल्याला बुरूज पहायला मिळतात. गडाचे वैशिष्ट्य म्हणजे गडाचा पूर्वेकडील भाग निमुळता होत गेला आहे. तर गडाचा पश्चिम भाग रुंद आहे. गडाच्या पुर्वेकडील अगदी शेवटच्या निमुळत्या टोकावर टेहाळणीसाठी बुरूज बांधण्यात आला आहे. या तटबंदीमध्ये दोन दिंडी दरवाजे आहेत. त्यातील उत्तरेकडील दिंडी दरवाजात दगडी ढासळल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा दरवाजा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी जाण्याचा मोह टाळावा. याव्यतिरिक्त गडावर लक्ष वेधून घेणारा तलाव आहे. या तलावात बारमाही पाणी असल्याची माहिती स्थानिक देतात. तलावाच्या बाजूला काही वाड्यांचे अवशेष पहायला मिळतात. महिमानगडाच्या माथ्यावर घरांचे अवशेष, कबर तसेच किल्लेदाराच्या वाड्यांचे अवशेष पहायला मिळतात. गडावर पाण्याचा तलाव असून हा तलाव सुंदर आणि तितकाच खोल आहे. तलावाच्या इथून एक वाट गडाच्या इशान्येला जाते. या इशान्येवर असलेल्या सोंडेंवर तटबंदी असून तटबंदीमध्ये चोर दरवाजा आहे. गड फिरण्यासाठी साधारण अर्धा ते एक ताल लागू शकतो. गडावरून आपल्याला वर्धनगड, भूषणगड हे गडकोट आणि जरंडेश्वराचा डोंगर दिसतो.
गडावर जायचे कसे
महिमानगडावर जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग महिमानगड गावातू गडावर गेला आहे. दर दुसरा मार्ग दहीवडे मार्गे शिंदी बुद्रूक या गावातू गडावर गेला आहे. शिंदू बुद्रूक मार्गे गडावर जाणारी वाट पुढे जाऊन महिमानगड या गावातून गडावर जाणाऱ्या वाटेला मिळते. सातारा-पंढरपूर मार्गावर दहिवडी ताल्याक्याच्या हद्दीत महिमानगडा आहे. त्यामुळे सातार-पंढरपूर किंवा फलटण-दहिवडी मार्गे सातारा जाणारी गाडी पकडून तुम्ही महिमानगडाच्या दिशेने जाऊ शकता. महिमानगड फाट्यावर उतरल्यानंतर फाटा ते महिमानगड हे गाव दीड किलोमीटरचे अंतर आहे. महिमानगड गावातून गडावर जाण्यास अर्धा ते एक तास लागू शकतो.
गडावर राहण्याची सोय आहे का
गडावर राहण्याची कोणतीही सोय नाही. मात्र, मुक्काम करायचाच असेल तर गडाच्या पायथ्याला असणाऱ्या गावातील शाळेमध्ये मुक्काम करता येईल. गडावर पाण्याची काही टाकी आहेत. मात्र, ते पाणी कितपत पिण्यायोग्य आहे. याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे गडावर जाताना शक्यतो मुबलक प्रमाणात पाणी आणि जेवणाच्या गोष्टी घेऊन जावा.
हे लक्षात ठेवा
1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.
आपले गडे हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुपला, मित्रांना शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.