रांगड्या सातारा जिल्ह्यातील रांगडा गड म्हणजे Kenjalgad Fort होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यांमध्ये असणार्या डोंगरात अगदी थाटात उभा आहे. गडाची सध्या दुरावस्था झाली असली तरीही गडाचं ऐतिहासिक महत्त्व लख्ख सोन्यासारखं आज, उद्या आणि भविष्यातही चकाकत राहणार आहे. पुणे आणि वाई या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान असणाऱ्या केंजळगडावरून वाईतील धोम आणि पुण्यातील देवघर धरणाचे विहंगम दृश्य पाहता येतं.
केंजळगडाचे विशेष महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नाव गडाला दिले होते. केंजळगड प्रामुख्याने चार नावांनी ओळखला जातो. पहिलं नाव म्हणजे केंजळगड, केलंजा, घेराकेळंज आणि चौथ नावं मनमोहनगड. या चार नावांपैकी एक नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलं आहे. जसजस आपण गडाच्या इतिहासात डोकाऊ तसतस छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेल्या नावाची आपण माहिती घेऊ. वाई आणि भोरच्या दरम्यान आणि रायरेश्वराचा शेजारी असणाऱ्या या केंजळगडाचा इतिहास नक्की जाणून घ्या. आणि आवर्जून गडाला भेट द्या.
केंजळगडाचा इतिहास
सातारा जिल्ह्यातील डोंगरी किल्ला म्हणून केंजळगडाची इतिहासात नोंद आहे. केंजळगडाच्या इतिहासात डोकावल्यावर आपल्याला अनेक गोष्टींची माहिती होते. गडाचा इतिहास फार जूना आहे. बाराव्या शतकात राजा भोज याने केंजळगडाची निर्मिती केल्याचे सांगीतले जाते. परंतु सोळाव्या शतकापासूनचा केंजळगडाचा इतिहास ज्ञात आहे. निझामशाही पासून, आदिलशाही, मराठ्यांचे स्वराज्य आणि पुढे इंग्रजांच्या राजवटीपर्यंतचा सर्व प्रवास गडाने अनुभवला. गडावर या सर्व राजघराण्यांनी आपले अधिराज्य गाजवले.
सोळाव्या शतकाच्या पुर्वार्धात केंजळगडावर निझामशाही आणि आदिलशाही यांची सत्ता होती. टप्याटप्याने दोन्ही हुकुशाहांनी केंजळगडावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. इसवीसन 1635-36 च्या दरम्यान निझामशाहीचा अस्त झाला. त्यानंतर 1648 साली आदिलशाहीने केंजळगड आपल्या ताब्यात घेत गडावर आपली सत्ता निर्माण केली. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी एक-एक गड ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. सन 1674 मध्ये शिवरायांचा मुक्काम कोकणातील चिपळून शहरात पडला होता. स्वराज्या विस्तार करण्याच्या हेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी वाई परिसरातील सर्व गडांवर भगवा झेंडा फडकवला होता. मात्र, केंजळगड अजूनही स्वराज्यात आला नव्हता.
केंजळगडावर भगवा फडकवण्याचा निर्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. त्यामुळे मराठ्यांची फौज त्यांनी केंजळगड काबीज करण्यासाठी धाडली. यावेळी केंजळगडाची जबाबदारी आदिलशाहीचा किल्लेदार गंगाजी विश्वासराव किरदत याच्यावर होती. त्यांने मराठ्यांना कडवी झूंज दिली, पण मराठ्यांच्या मर्दुमकीपुढे त्याचा निभाव लागला नाही आणि तो मारला गेला. 24 एप्रिल 1674 ही तारीख केंजळगडाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली, मराठ्यांनी गडावर भगवा फडकवला आणि गड स्वराज्यात दाखल झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाने नामकरण मनमोहनगड असे केले.
1674 ते 1701 हा मोठा काळ केंजळगड स्वराज्यात होता. मात्र, 1701 साली केंजळगड औरंगजेबाच्या ताब्यात गेला. परंतु त्याचा हा आनंद फार काळ मराठ्यांनी टिकू दिला नाही. 1702 मध्ये केंजळगड मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला आणि स्वराज्यात सामील केला. पुढे 1818 साली स्वराज्यातील इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे केंजळगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
गडावर पाहण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत?
केंजळगडाचा विस्तार प्रामुख्याने पूर्व-पश्चिम असा आहे. गड छोटा असून एकाच दिवसात संपूर्ण गड पाहता येतो. गडावर प्रवेश केल्यानंतर गडाच्या माथ्यावर पाण्याचा एक छोटा तलाव निदर्शणास पडतो. त्याच बरोबर थोड गडाच्या मध्यभागी आल्यानंतर जुन्या मंदिराचे अवशेष व त्यातील काही मुर्ती आपलं लक्ष वेधून घेतात. इतर गडांप्रमाणेच केंजळगडावर सुद्धा केळंजाई देवीचे मंदिर आहे.
केळंजाई देवीच्या मागे चुण्याचा घाणा पहायला मिळतो. तिथून पुढे काही अंतरावर गडावरील कोठार सदृश्य वास्तू नजरेस पडते. ही वास्तू म्हणजे दगड आणि विटा मिळून बांधलेली छोटीशी खोली होय. सध्या ही खोली पडक्या अवस्थेत असून त्याचे छप्पर उडालेले आहे. या बांधकामाचा विचार केल्यास उत्तर पेशवे काळात अशा पद्धतीचे बांधकामाची रचना केली जायची. त्यावरुन हे बांधकाम उत्तर पेशवे काळातील असण्याची शक्यता आहे. गडावर तटबंदीचे थोडेफार अवशेष पहायला मिळतात. त्याच बरोबर गडावर उत्तर-पश्चिम बाजूला आणखी एक चुन्याचा घाणा पहायला मिळतो. याव्यतिरिक्त गडावर पाण्याचे दोन तलाव असून खोदीव टाकी देखील पहायला मिळतात.
गडावर जायचं कसं ?
केंजळगडावर जाण्याच्या तीन वाटा आहेत. एक वाट वाईवरून खावलीमार्गे गडावर जाते, दुसरी वाट भोरवरून कोर्लेमार्गे गडावर जाते आणि तिसरी वाट रायरेश्वरमार्गे केंजळगडावर जाते.
वाईवरून गडावर जाण्यासाठी वाईतून एसटी किंवा वडाप पकडून खावली गावात यावे. खावली गावात एसटी स्टँडच्या इथून पुढे गेल्यानंतर गडावर जाण्याची वाट सुरू होते. पावसाळी वातवरणात या भागात असणारे निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून घ्यावे आणि गडाच्या दिशने मार्गस्थ व्हावे. अर्धा गड चडल्यानंतर गडावर एक वस्ती लागते. इथून पुढे पायवाटने अर्धा ते एक तासात आपण गडावर पोहचतो.
पुणे किंवा भोरहून गडावर येणार असाल तर कोर्ले या गावातून रस्ता गडावर गेला आहे. भोरहून कोर्ले गावात जाण्यासाठी एसटी बसची सुविधा आहे. कोर्ले गावातून गडावर जाण्यासाठी साधारण दोन तास लागतात. या मार्गे गडावर आल्यानंतर माचीवर पूर्वेकडे सपाटीवर पाच ते सात खोपटांची वस्ती असून तिला ओव्हरी म्हणतात. या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे गडावर कातळात कोरून काढलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या एक दोन नव्हे तर तब्बल 55 पायऱ्या आहेत. कातळात पायऱ्या कोरून काढण्यासाठी कारागिरांनी किती कष्ट घेतले असतील याची जाणीव होते.
रायरेश्वराहून केंजळगडावर येण्यासाठी रायरेश्वर गडावर असणाऱ्या देवळाकडून मागच्या दिशेने उजवीकडे जाऊन शेताच्या बांधावरून टेकडीखाली उतरले की समोरच केंजळगडाचा घेरा दिसतो. तसेच बालेकिल्ला आणि रायरेश्वराला जोडणारी डोंगररांग स्पष्ट दिसते. रायरेश्वरावर जंगम लोकांची वस्ती आहे. त्यामुळे त्यांना जरी केंजळगडावर जाण्याच मार्ग विचारल, तरी ते सुद्धा तुम्हाला योग्य रस्ता दाखवतील.
गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का?
केंजळगडावर राहण्याची कोणताही सोय नाही. तंबू ठोकून गडावर राहणे सुद्धा थोडे धोकादायक आहे. केंजळगडाला भेट देणाऱ्यांची सख्या कमी असल्यामुळे शक्यतो गडावर राहणे टाळावे. गडावर जाताना वाटेत लागणार ओव्हरीची वस्ती आहे. तेथील केंजळाई देवीच्या मंदिरात दहा ते बारा जणांची राहण्याची सोय होऊ शकते. त्याच बरोबर जेवणाची सुद्धा गडावर कोणतीही सोय नाही. गडावर पाण्याची टाकी आहेत त्यामुळे पाण्याची सोय होऊ शकते.
केंजळगडापासून हाकेच्या अंतरावर असणारे गड
वाईमध्ये केंजळगडाच्या हद्दीत अनेक गड पाहता येण्यासारखे आहेत. सर्वात पहिला गड म्हणजे किल्ले रायरेश्वर, कमळगड, पांडवगड, वैराटगड, चंदन-वंदन याव्यतिरिक्त अनेक गड हे वाईच्या जवळपास आहेत. सर्व गडांना ऐतिहासिक पार्श्वभुमी आहे. त्यामुळे वेळ काढून हा ऐतिहासिक खजीना आवर्जून पहावा.
आपले गड आपली मंदिर आहेत. त्यामुळे गडाचे पावित्र्य राखा गडावर कोणताही कचरा करू नका.