मुंबईतील दादरमध्ये टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांना मोठा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामुळे फसव्या योजनांचा (Ponzi Scheme) पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. दुप्पट पैसे मिळतील या अमिषाला बळी पडून लोक वारंवार एकच चुक करतात आणि आयुष्यभराची कमाई अशा योजनांमध्ये गुंतवतात. परंतु या योजनांमध्ये गुंतवलेला पैसा पुन्हा मिळेल याची कसलीही खात्री केली जात नाही आणि शेवटी मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. अशा फसव्या योजनांमुळे लोकांनी आत्महत्या केल्याची प्रकरणं सुद्दा घडली आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये टोरेस कंपनीच्या घोटाळ्यामुळे पॉन्झी हे नाव विविध मार्गांनी सतत तुमच्या कानावर पडत असेल. परंतु बऱ्याच जणांचा पॉन्झी योजना म्हणजे काय? पॉन्झी हे नाव का पडलं? त्याचा इतिहास काय आहे? या गोष्टींची माहिती नाही.
पॉन्झी योजना काय आहे? अशा योजानांमध्ये पैसे गुंतवायचे का? काय खबरदारी घ्यायची? पॉन्झी या नावाच इतिहास काय आहे? तुमच्या मनात असणाऱ्या शक्य त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ब्लॉगच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा ब्लॉग संपूर्ण वाचल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत आवर्जून वाचा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून अशा योजनांना कोणीही बळी पडणार नाही.
पॉन्झी योजना म्हणजे काय? | What is a Ponzi Scheme
पॉन्झी योजना ही गुंतवणूक घोटाळ्याचा एक प्रकार आहे जी “मंगेशला पैसे देण्यासाठी सुरेशला लुटणे” या तत्त्वावर चालते. मूळत:, योजनेचे आयोजक नवीन गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या पैशांचा वापर कायदेशीर नफा मिळवण्याऐवजी पूर्वीच्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी करतात. गुंतवणूकदारांना दिलेला परतावा सामान्यतः असामान्यपणे जास्त असतो, ज्यामुळे योजना आकर्षक बनते. परंतु हे परताव्यांचे अमिष दीर्घकाळ टिकू शकत नाही, कारण गुंतवणूकदारांना देण्यात येणारा परतावा, हा प्रत्यक्ष नफा किंवा गुंतवणुकीतून मिळत नाही, तर नवीन गुंतवणूकदारांच्या पैशांमधून उभा केला जातो.
पॉन्झी योजना ही प्रामुख्याने नवीन गुंतवणूकदारांच्या पैशांवर सुरू असते. ज्या क्षणी नवीन गुंतवणुकीचा वेग कमी होतो किंवा जेव्हा बरेच गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढू पाहतात, तेव्हा योजना कोलमडते आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या हक्काच्या पैशांवर पाणी सोडावं लागतं.
पॉन्झी योजना कशी कार्य करते?
1. गुंतवणूकदारांना आकर्षित करणे – पॉन्झी योजना सामान्यत: कमी जोखमीसह उच्च, सातत्यपूर्ण परताव्याच्या आश्वासनांसह काही सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना आकर्षित करून सुरू करतात. लोकांचा विश्वास संपादित करण्यासाठी सुरुवातील चांगला परतावा दिला जातो.
2. नवीन पैसे वापरून परतावा भरणे – कायदेशीर गुंतवणुकीसाठी उभारलेले भांडवलाचा वापर करण्या एवजी फसवणूक करणारा नवीन गुंतवणूकदारांच्या पैशांचा वापर करून जुन्या गुंतवणूकदारांना परतावा देतो. या परताव्यांची अनेकदा “नफा” म्हणून विक्री केली जाते, ज्यामुळे योजना यशस्वी होते.
3. विस्तार – वर्ड-ऑफ-माउथ आणि वर्ड-ऑफ-नेट (सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मद्वारे) गुंतवणूकदारांच्या जाहिरात केली जाते. जोपर्यंत नवीन गुंतवणूक येत राहतात, तोपर्यंत ही योजना नफ्याचा फुगा फुगवत राहते आणि जुन्या गुंतवणूकदारांना चांगला मोबदला मिळत राहतो.
4. फसवणूक – अखेरीस, योजना अडचणीत येते. नवीन गुंतवणूकदारांची संख्या कमी होऊ लागते किंवा बरेच गुंतवणूकदार एकाच वेळी पैसे काढतात. त्यामुळे पैशांचा फुगा अखेरीस फुटतो आणि योजना कोलमडते. फसवणूक करणारे राहिलेली रक्कम घेऊन गायब होतात. ज्यामुळे बहुतेक गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
काय आहे पॉन्झी नावाचा इतिहास
“पॉन्झी स्कीम” या शब्दाचे नाव चार्ल्स पॉन्झी या इटालियन-अमेरिकन घोटाळेबाजाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तर हा चार्स्ल पॉन्झीने 1900 च्या दशकाच्या सुरुवातीला ही फसवी गुंतवणूक धोरण वापरण्यासाठी कुप्रसिद्ध झाला होता. पॉन्झीने गुंतवणूकदारांना वचन दिले की ते आंतरराष्ट्रीय पोस्टल रिप्लाय कूपनमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा कमवू शकताक. ही प्रणाली देशांमधील टपालाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाते.
पॉन्झीने दावा केला की तो ही कूपन एका देशात स्वस्तात खरेदी करू शकतो आणि दुसऱ्या देशात जास्त किंमतीला विकू शकतो. प्रत्यक्षात, पोन्झी पोस्टल कूपनमध्ये अजिबात गुंतवणूक करत नव्हता. तो फक्त नवीन गुंतवणूकदारांकडून मिळालेला पैसा जुन्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी वापरत होता. 1920 मध्ये पॉन्झीचा घोटाळा उघड झाला. परंतु या काळात त्याने त्याने हजारो लोकांची फसवणूक केली होती. त्याने गुंतवणूकदारांचे लाखो डॉलर्सचे नुकसान केले होते. तेव्हापासून पॉन्झीचे नाव या फसव्या योजनांना जोडण्यात आले. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही एखादी फसवी योजना असेल तर त्या योजनेला पॉन्झी योजना असे म्हंटले जाते.
पोंझी योजना कशी ओळखायची
1. उच्च, सातत्यपूर्ण परताव्याची आश्वासने – पॉन्झी योजना सहसा अवास्तव उच्च परतावा देतात ज्यात फारसा धोका नसतो. कायदेशीर गुंतवणुकीत, परतावा वेगवेगळा असतो आणि कोणतीही गुंतवणूक पूर्णपणे जोखीममुक्त नसते.
2. पारदर्शकतेचा अभाव – गुंतवणुकीचे कार्य कसे चालते याविषयी अस्पष्ट असल्यामुळे पॉन्झी योजना कुप्रसिद्ध आहेत. ते प्रश्नांना परावृत्त करू शकतात किंवा गुंतवणूक धोरणाबद्दल तपशील देण्यास नकार देऊ शकतात. त्यामुळे या योजनांमध्ये पारदर्शकतेचा अभाव जाणवतो.
3. विनापरवाना किंवा अनियंत्रित ऑफरिंग – अनेक पॉन्झी योजना आर्थिक नियामक किंवा सरकारी संस्थांकडे नोंदणीकृत नसतात. ते कायदेशीर गुंतवणुकीला लागू असलेल्या कायदेशीर आणि नियामावलीची चौकट मोडून बाहेर काम करतात.
4. निधी काढण्यात अडचण – पॉन्झी योजनांमध्ये अनेकदा गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे काढणे कठीण जाते. अनेक वेळा विविध कारणे देत पैसे देण्यास टाळाटाळ केली जाते.
5. नवीन गुंतवणूकदारांची आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रित करतात – पॉन्झी योजना ही नवीन गुंतवणूकदारांवर सुरू असते. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांना योजनेमध्ये सामील करून घेण्यासाठी जुण्या गुंतवणूकादारंवर दबाव टाकला जातो.
6. पेमेंटमध्ये मागे पडणे – जेव्हा पॉन्झी योजना अयशस्वी होण्यास सुरुवात होते. म्हणजेच गुंतवणूकदार मिळत नाहीत, तेव्हा फसवणूक करणारा पैसे देण्यास विलंब करू शकतो. तसेच याचा दोष बाजारातील परिस्थिती किंवा इतर बाह्य घटकांना देण्यास प्राधान्य देतो.
या आहेत सिद्ध पॉन्झी योजना
बऱ्याच पोंझी योजनांनी इतिहासावर कायमचा ठसा उमटवला आहे. त्यामुले घोटाळ्यांच्या इतिहासात त्यांची नोंद झाली आहे. काही सर्वात कुप्रसिद्ध पॉन्झी योजनांची आपण थोडक्यात माहिती घेऊ.
1. चार्ल्स पॉन्झी (1920) – चार्ल्स पॉन्झीची स्वतःची योजना इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध योजनांपैकी एक होती. त्याच्या शिखरावर, पॉन्झीने गुंतवणूकदारांना केवळ 45 दिवसांत 50% परतावा देण्याचे वचन दिले. तो जुन्या गुंतवणूकदारांना नवीन गुंतवणूकदारांकडून पैसे देत असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याची योजना कोलमडली आणि त्याला फसवणुकीसाठी अटक करण्यात आली.
2. बर्नी मॅडॉफ (2008) – बर्नी मॅडॉफची पॉन्झी योजना इतिहासात सर्वात मोठी मानली जाते, ज्याने अंदाजे $65 अब्ज गुंतवणूकदारांची फसवणूक केली. मॅडॉफने गुंतवणूकदारांना स्थिर आणि सातत्यपूर्ण परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु 2008 च्या आर्थिक संकटात त्याची योजना उघड झाली. मॅडॉफला अटक करण्यात आले आणि 150 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
3. ॲलन स्टॅनफोर्ड (2009) – एक हाय-प्रोफाइल पॉन्झी योजना फायनान्सर ॲलन स्टॅनफोर्डने तयार केली होती. ज्याने ठेवींच्या प्रमाणपत्रांचा समावेश असलेली फसवी गुंतवणूक योजना चालवली होती. 2009 मध्ये त्याची योजना उघड झाली आणि त्याला 110 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
पॉन्झी योजनांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे
1. गुंतवणूक करण्यापूर्वी संशोधन करा – गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी सखोल संशोधन करा. कोणत्याही गुंतवणुकीची वैधता सत्यापित करा आणि ती ऑफर करणारी संस्था संबंधित वित्तीय अधिकार्यांकडे योग्यरित्या नोंदणीकृत आहे का याची खात्री करा.
2. अवास्तव परताव्याला बळी पडू नका – जर एखाद्या योजाना तुम्हाला गुंतवणुकीची संधी कोणत्याही जोखीमशिवाय उच्च परतावा देण्याचे आश्वासन देत असेल, तर ही धोक्याची घंटा आहे. उच्च परतावा सहसा उच्च जोखमीसह येतो आणि कोणतीही कायदेशीर गुंतवणूक सातत्यपूर्ण, असाधारण परताव्याची हमी देऊ शकत नाही.
3. आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या – प्रमाणित आर्थिक नियोजक किंवा सल्लागार यांच्याशी बोला जो तुम्हाला गुंतवणुकीचे मूल्यांकन करण्यात आणि घोटाळे टाळण्यात मदत करू शकेल.
4. विश्वसनीय प्लॅटफॉर्म वापरा – नियमन केलेल्या वित्तीय संस्था किंवा गुंतवणूक प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूक करा. हे प्लॅटफॉर्म सहसा सरकारी एजन्सींच्या देखरेखीच्या अधीन असतात जे गुंतवणूकदारांचे संरक्षण करू शकतात.
पॉन्झी योजना सुमारे शतकाहून अधिक काळापासून सुरू आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात या योजनांचे पितळ उघडे पडत आहे. परंतु या ब्लॉगमुळे तुम्हाला आता हे घोटाळे कसे चालतात, याचे धोके कसे ओळखायचे आणि गुंतवणुकीच्या संधींबद्दल सावध कसं रहायचा याची माहिती मिळाली असेल. त्यामुळे तुम्हा आता अशा योजनांना बळी पडणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. पॉन्झी योजना म्हणजेच एक हवा भरलेला फुगा आहे. तो कधी ना कधी फुटनारच असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.